श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे

Blog page

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवेअजिंक्य योद्धा !!! “

 

बाजीरावांचे मूळ नाव ‘विश्वनाथ’ होते. त्यांचे वडील श्रीमंत बाळाजी विश्वनाथ भट हे सातार्यांच्या थोरल्या श्री शाहू महाराजांचे पेशवे म्हणजेच मुख्य प्रधान होते. पूर्वीच्या काळी आपल्या पित्याचे स्मरण रहावे यासाठी त्यांचेच नाव आपल्या पुत्राला ठेवण्याची पद्धत रुढ होती. बाळाजीपंतांनीही आपल्या तीर्थरुपांच्याच नावावरून (विश्वनाथ परशुराम भट) आपल्या पुत्राचेही नाव ‘विश्वनाथ’ असेच ठेवले. मग विश्वनाथचे बाजीराव कसे झाले बरे ? त्याबाबत एक दंतकथा आहे. त्या दिवशी, म्हणजेच दि. १८ ऑगस्ट १७०० साली बाळाजीपंत आजवर जितके ‘बाजी’ नावचे पराक्रमी पुरूष होऊन गेले (उदा: बाजी जेधे, बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर, मुरारबाजी देशपांडे इ.) त्यांची बखर वाचत होते. इकडे पंतांची बखर वाचून पूर्ण झाली आणि सुईणीने येऊन वार्ता सांगितली, ‘पुत्र प्रप्त जाहला’. बाळाजीपंतांना हा योगायोग वेगळाच वाटला. बखर वाचून झाल्यावर लगेचच ‘माझीही त्या बखरीतच जागा आहे’ हे दाखवण्यासाठीच जणू पुत्र जन्माला आला असावा. हा शुभशकुन समजून बाळाजीपंतांनी आपल्या पुत्राचे नाव ‘बाजीराव’ ठेवले. अर्थात या गोष्टीला अस्सल कागदोपत्री पुरावा नाही. कथा काहीही असो, परंतू बाळाजी विश्वनाथांच्या मनोरथांप्रमाणे त्यांच्या पुत्राने पुढे आपल्या अतुलनिय पराक्रमाने सार्यां जगाचे डोळे दिपवून टाकले !!इ.स.१७१९ च्या पुर्वार्धात बाळाजी विश्वनाथांच्या दिल्ली मोहीमेत बाजीराव जातीने सहभागी झाले होते. हे त्यांचे पहिलेच दिल्लीदर्शन. दिल्ली दरबारचे काम कसे चालते हे पाहण्याची संधी बाजीरावांना प्रथम याच वेळेस मिळाली. परंतू दूर्दैवाने काहीच दिवसात श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचं निधन झालं (मृत्यू: दि. २ एप्रिल १७२०) आणि स्वराज्याचं पेशवेपद रिक्त पडलं…इ.स. १७१३ मध्ये कान्होजी आंग्र्यां नी शाहू महाराजांचे पेशवे बहिरो मोरेश्वर पिंगळे यांना अटक केल्यानंतर शाहूराजांनी बाळाजीपंतांना पेशवेपद दिले. तेव्हा ‘गरज होती’ म्हणून ते कोणालाही खटकले नाही. पण आता त्यांच्या निधनानंतर मात्र सातारा दरबारातील देशस्थ महाराष्ट्रीय ब्राह्मणांना पेशवेपदी पुन्हा ‘देशस्थ’च हवा असे वाटू लागले. श्रीपतराव परशुराम पंतप्रतिनिधी, आनंदराव पंतसुमंत, नारो रंगराम शेणवी पंतमंत्री, चिमणाजी दामोदर मोघे अशा देशस्थांनी बाजीरावांसारख्या ‘चिपळूण्या’ला पेशवेपद मिळू नये यासाठी प्रयत्न सुरू केले. पण तरिही शेवटी अंबाजीपंत पुरंदरे, नाथाजी धुमाळ, पिलाजीराव गायकवाड यांनी योग्य रीतिने महाराजांना समजावल्यामूळे महाराजांनी, “ चैत्र शुद्ध सप्तमी, शके १६४२, शार्वरीनाम संवत्सरी, गुरुवारी, राजेश्री बाजीराव बल्लाळ, राजेश्री बाळाजी विश्वनाथ मुख्य प्रधान यांचे पुत्र राव मशारनिल्हे यांजवरी कृपाळू होऊनु पेशवाईची वस्त्रे दिल्ही ”. आणि म्हणूनच जळफळाट झालेल्या सातारा दरबारातल्या देशस्थांनी पुढे आयुष्यभर बाजीरावांना पाण्यातच पाहीले.बाजीरावांना पेशवेपद मिळाल्यानंतर क्षणाचीही उसंत मिळाली नाही. मोंगल सुभेदार हुसेनअली सय्यद हा खानदेशात आपल्याच एका बंडखोर सरदाराशी लढत होता. शाहू महाराजांच्या आज्ञेवरून बाजीराव खानदेशात गेले आणि हुसेनअलीला मदत करून खानदेशातील बंड मोडले. परंतू बाजीरावांसारखा ‘पोरगा’ पेशवा झालाय आणि तोही आत्त बाहेर खानदेशात गुंतलाय हे पाहून हैद्राबादच्या निजाम-उल-मुल्काने, मीर कमरुद्दीन सिद्दीकीने स्वराज्यावर आक्रमण केले. निजामाच्या मोंगली फौजा शेवगाव-पैठण ओलांडत असतानाच बाजीराव झंझावाती वेगाने येवून निजामाच्या मोंगली फौजांवर तुटून पडले. अखेरीस निजाम दाती तृण धरून शरण आला. औरंगाबादेत निजामाचा जनाना होता. तहासाठी बाजीराव पेशवे औरंगाबादेत आलेले पाहून त्या ‘सुरतपाक’ पेशव्याला बघून निजामाच्या बेगमांनी श्रीमंतंवर कौतुकाने चक्क मोती उधळले ! अर्थात या सार्याा प्रकाराने निजामाचे काय झाले हे वेगळे सांगायला नकोच ! अर्थात पुढे निजामाला असा जळफळाट करण्याची सवयच झाली. कारण युद्धभूमीवर यापुढच्या प्रत्येक वेळी निजामाचा पराभवच झाला ! इ.स. १७२७ मध्ये बाजीराव कर्नाटकात असताना निजाम पुणे जाळण्यासाठी निघाला. अर्थात बाजीरावांना ही बातमी समजलीच. निजाम नगरला येईपर्यंत त्याला समजले की, आपण पेशव्याचे पुणे जाळण्याआधीच पेशवा असफजाहीत घुसून जाळपोळ करतोय… शेवटी आपल्या राजधानीचे रक्षण करण्याच्या नादात आपला अवजड तोफखाना नगरलाच ठेऊन निजाम परत फिरला, हे पाहताच बाजीराव त्वरेने औरंगाबादकडे निघाले. औरंगाबाद आणि पैठण यांच्यामध्ये असणार्या, पालखेडच्या मैदानातच बेसावध असताना पेशव्यांच्या फौजांनी निजामाला गराडले आणि त्याचे पाणीच तोडले. दि. २५ फेब्रुवारी १७२८ मध्ये, पालखेड येथे पेशव्यांच्या फौजांनी निजामाला झोडपले. पाण्याने तहानलेला निजाम शरण आला. दि. ६ मार्च १७२८ रोजी ‘मुंगी-पैठण’ येथे निजाम आणि पेशवे यांच्यात तह झाला. यानंतर जवळपास दहा वर्षे निजामाने पेशव्यांविरूद्ध हत्यार उचलले नाही, परंतू सातारा दरबारातील पंतप्रतिनिधी, पंतसुमंत, पंतमंत्री, सेनापती दाभाडे अशा पेशव्यांना पाण्यात पाहणार्यात लोकांना भडकावण्याचे काम मात्र त्याने सुरूच ठेवले. पुढे ऑक्टोबर १७३७ मध्ये बाजीरावसाहेब दिल्लीवर धडक देण्यास निघाले असता दिल्लीच्या बादशाहाने निजामास मदतीसाठी साद घातली. खरंतर निजाम बाजीरावांना शह द्यायला निघाला खरा, परंतू पेशव्यांनी अत्यंत जलद हालचाली करून निजामाची छावणी भोपाळला पडली असता, पालखेडप्रमाणे इथेही प्रथम त्याचे पाणी तोडले आणि त्याच्या संपूर्ण छावणीला गराडले. आपल्या बापाला मराठ्यांनी पकडला हे पाहून निजामाचा मुलगा नासिरजंग हा हैद्राबादेहून निघाला. परंतू तो सातपुडा ओलांडून जात असतानाच चिमाजीआप्पांनी त्याला नर्मदेच्या दक्षिण तीरावरच रोखून धरले. झाले ! फक्त टाचा घासण्याशिवाय नासिरजंग काहीच करू शकला नाही. इकडे मराठ्यांच्या हल्ल्यामूळे निजाम इतका घाबरला की तो हत्तीवरच्या अंबारितच ‘लपून’ राहीला. अखेरीस याही वेळेस नाक हातत धरून शरण येण्याखेरीज निजामाला पर्याय नव्हता. खुद्द श्रीमंत बाजीराव पेशवे दक्षिणेत चिमाजीआप्पांना लिहीलेल्या पत्रात म्हणतात, “….. नबाब बुनगे काही भूपाळात व काही इस्लामपूरात टाकून सुलुखाची संदप लावून कोस-दोन कोस चालतात. आमच्या फौजा चौतर्फ चालवून दाणागल्ला-घास-लकडी बंद केली ऐसा प्रसंग जाहला तेव्हा नबाब सर्वांचे दु:ख पाहून, बहुतच काहीला होऊन सलोखाविसी त्वरा केली. जो नबाब चौथाई व सरदेसमुखीची नावे घेत नव्हता त्याने मालवे दरोबस्त ऐसे खास दस्तफाने लेहून दिल्हे….”. दुराई-सराईच्या या कराराने मरठ्यांचा उत्तरेतला प्रभाव बाजीरावांनी निश्चित केला.जून १७२१ च्या सुमारास पेशव्यांनी मोंगल सरदार दाऊदखान पन्नी याचा माळव्यात प्रचंड पराभव केला. इ.स. १७२२ मध्ये कोकणात सरखेल कान्होजी आंग्रे आणि पोर्तुगिजांच्यात काही बेबनाव झाला. तो सोडवण्यासाठी कान्होजी आंग्र्यांकनी बाजीराव पेशव्यांना मदतीसाठी साद घातली. हे पाहताच, केवळ बाजीरावांच्या नावाच्या धाकानेच पोर्तुगिजांनी आंग्र्यांठशी तह केला. इ.स. १७२३ मध्ये माळवा प्रांतातील उज्जैनीचा सुभेदार दयाबहाद्दर या पराक्रमी मोंगल सरदाराचा बाजीरावांनी प्रचंड पराभव केला. नोव्हेंबर १७२५ मध्ये बाजीराव कृष्णा नदी ओलांडून दक्षिणेत उतरले. या स्वारीत दक्षिणेतल्या सार्याव संस्थानिकांनी, गुबीचे मुरारराव घोरपडे, अर्काट्चा नबाब, गदग, लक्ष्मेश्वर, कनकगिरी, चित्रदूर्ग, सुरापूर, श्रीरंगपट्टणम, बिदनूर (बसरूर) इ. लहानमोठ्या संस्थानिकांनी शाहू महाराजांचे मांडलिकत्व मान्य केले. बाजीराव पुढे तंजावर-मदुरै पर्यंत जाणार होते, परंतू निजामाच्या स्वराज्यावरील स्वारीमूळे पेशव्यांना हैद्राबादकडे दौडणे भाग पडले. इ.स. १७२८ मध्ये चिमाजीआप्पांनी पुन्हा माळव्यात दयाबहाद्दर आणि गिरीधर बहाद्दर या दोघा भावांना मात दिली. आप्पांनी खासा गिरीबहाद्दर मारला !इ.स. १७२९-३० मध्ये बाजीरावांचा मुक्काम मध्य प्रदेशातील गढामंडला येथे असताना महाराणा छत्रसालाची “ जो गती ग्राह गजेंद्र की, सो गती भई है आज ! बाजी जात बुंदेलाकी राखो बाजी लाज ” अशी मदतीची हाक आली. छत्रसाल हे मोंगल सरसेनापती महंमदखान बंगश याच्या वेढ्यात, पन्न्याच्या किल्ल्यात अडकून पडले होते. बाजीराव आपल्या फौजा घेऊन दिवसाला सरासरी तीस-पस्तिस कोसांची (१ कोस = २ मैल, १ मैल = १.६ कि.मी.) दौड मारून बुंदेलखंडात पोहोचले. पन्न्याच्या किल्ल्याच्या बाहेर जवळच घमासान युद्ध झाले. बंगशाचा प्रचंड पराभव झाला, आणि तो जैतपूरच्या रोखाने पळाला. परंतू बाजीरावांनी जैतपूरलाही वेढा घातला. अखेरीस बंगश शरण आला. बंगशाने बाजीरावांची इतकी धास्त खाल्ली की पुढे १७३५ मध्ये बाजीरावांच्या मातोश्री राधाबाईसाहेब काशियात्रेला गेल्यावर काशिचा सुभेदार असलेल्या बंगशाने राधाबाईंची उत्तम बडदास्त ठेवून त्यांना भेटीदाखल एक हजार रुपये रोख आणि तांबडी आलवणं (विधवा स्त्रीयांनी नेसण्याची तांबडी वस्त्रे) नजर केली. बुंदेलखंडातल्या या पराक्रमावर खूश होऊन छत्रसाल महाराजांनी बाजीरावांना पन्ना येथील हिर्यापच्या खाणी आणि आपल्या राज्याच्या एक तृतियांश हिस्सा, म्हणजेच सुमारे बत्तीस लक्ष वार्षिक उत्पनाचा मुलूख बाजीरावांना बक्षिस म्हणून देऊन टाकला. अर्थात बाजीरावांनी अत्यंत उदारपणे आपल्याला खासगीत मिळालेली ही मिळकत सरकारात जमा केली हे विशेष कौतुक ! शिवाय छत्रसालांनी आपली कन्या ‘मस्तानी’ हीचा विवाह बाजीरावांशी लावून दिला.बुंदेलखंडानंतर लगेच सेनापतींचा तंट उद्भवला. सेनापती त्र्यंबकराव दाभाडे हे पेशव्यांनी मिळवलेल्या ‘माळवा’ या मोक्याच्या प्रांतावर नजर ठेऊन होते. पेशव्यांना खाली ओढण्यासाठी दाभाड्यांनी आणि गायकवाडांनी निष्कारण ‘ब्राह्मण विरुद्ध मराठा’ असा जातियवाद पेटवून दिला. अखेरीस शाहू महाराजांच्या आज्ञेवरून पेशव्यांनी दाभाड्यांना गुजरातेत शिरून मात दिली. खासा सेनापती त्र्यंबकराव दाभाडे जंबुरीयाचा (लहान तोफेचा) गोळा लागून पडला.एप्रिल १७३७ च्या पहिल्या आठवड्यात बाजीरावांनी थेट दिल्लीवरच धडक दिली. बादशाहा घाबरून लाल किल्ल्यात लपून बसला. दिल्ली लुटली गेली. एकेकाळी दिल्लीचे सुलतान महाराष्ट्राला लुटत होते. आज शिवछत्रपतींचे स्वप्न साकार होत होते. आज भीमथडीची घोडी यमुनेच्या पात्रात थयथय नाचत होती ! बादशहाच्या उरात धडकी भरवून पेशवे पुन्हा माघारी पुण्याला आले.दि. १३ मे १७३९ रोजी पाच महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर इकडे चिमाजीआप्पांनी वसईच्या किल्ल्यावर भगवा झेंडा फडकावला. उत्तर कोकणातून पोर्तुगिजांचे समूळ उच्चाटन झाले. इ.स. १७४० मध्ये सुरुवातीला निजामपुत्र नासिरजंग आणि बाजीरावसाहेब यांच्यात औरंगाबादेजवळ घनघोर युद्ध झाले. परंतू शिरस्त्याप्रमाणे निजामपुत्राचा पराभव झाला. दि. २७ फेब्रुवारी १७४० रोजी झालेल्या तहान्वये बाजीरावांना हंडिया आणि खरघोण हे मध्या प्रांतातले परगणे निजामाकडून मिळाले. या प्रांताची व्यवस्था लावण्यासाठी बाजीराव नर्मदाकठच्या रावेर येथील वाड्यात राहीले. परंतू दूर्दैवाने, सततच्या धावपळीने आणि मस्तानीवरून पुण्यात उठलेल्या वादंगाने बाजीरावांची तब्येत बिघडली आणि दि. २८ एप्रिल १७४० या दिवशी, सोमवारी पहाटे श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी हे जग कायमचे सोडले….. या जगात आजपर्यंत अलेक्झांडर- सिझर पासून ते नेपोलियन पर्यंत आणि चंद्रगुप्तापासून ते शिवाजी महाराजांपर्यंत अनेक महापराक्रमी आणि कर्तृत्ववान योद्धे झाले. परंतू उण्यापुर्याज चाळीस वर्षांच्या आयुष्यात बत्तीस लढाया खेळून कायमच ‘अजिंक्य’ राहीलेला हा एकमेव सेनापती होता. शिवछत्रपतींच्या मनात आणि स्वप्नात असलेल्या ‘स्वराज्या’ला मूर्त रूप देणारा हा ‘ईश्वरदत्त सेनानी’ अखेर काळाच्या पडद्याआड गेला. मराठी राज्याचा हा धीरोदात्त पेशवा स्वर्गही जिंकून पुन्हा कधिही न परतण्याच्या मोहीमेवर गेला…बाजीराव पेशव्यांचे कर्तृत्व असामान्य होते. हिंदुस्थानच्या इतिहासात मराठ्यांना आणि महाराष्ट्राला मानाचे स्थान मिळवून देण्याचे कार्य बाजीरावांनी केले. शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्रात झालेल्या कर्तृत्ववान पुरूषांत बाजीराव पेशव्यांचा प्रथम क्रमांक आहे एवढे मात्र निश्चित. दि. १८ ऑगस्ट रोजी असणार्याब जयंतीनिमित्त या थोर पेशव्याची आठवण ताजी रहावी हाच या सार्या् उपद्व्यापामागचा हेतू ! अर्थात जोपर्यंत पुण्याचा शनिवारवाडा उभा आहे तोपर्यंत बाजीराव पेशव्यांचं नाव मराठी मनातून पुसणं अशक्य आहे हे मात्र नक्की ! बहुत काय लिहीणे ? महाराष्ट्राच्या या महान पेशव्याला मानाचा मुजरा… त्रिवार मुजरा.