किल्ले तुंग / कठीणगड

किल्ल्याची उंची: ३००० फूट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांगः लोणावळा
श्रेणी: सोपी
जिल्हा: पुणे

तुंग किल्ल्याच्या कठीणगड नावावरून असेच वाटेल की किल्ला चढायला कठीण आहे परंतु किल्ला चढण्यास फारच सोपा आहे. पवन मावळ प्रांतातील तुंग किल्ला हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. तुंग किल्ल्याची उंची जास्त असल्यामुळे पूर्वी बोरघाटमार्गे चालणाऱ्या वाहतुकीवर आणि लोहगड, विसापूर, तिकोना, कोराईगड या किल्ल्यांवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे.

इतिहास
तुंग किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही. मात्र १६५७ मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला. सन १६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली होती. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६ मे १६६५ रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावे जाळली, पण हे किल्ले मात्र ते जिंकू शकले नाहीत. ११ जून १६६५ रोजी झालेल्या पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तुंग हा हि एक किल्ला होता. पुरंदर तहानुसार १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
गडमाथा फारच आटोपता असल्यामुळे एक दोन तासात सर्व गड पाहून होतो. तुंगवाडीतून गडावर जाणारी वाट मारुतीच्या मंदिरा जवळून जाते. या मंदिरात १० ते १२ जणांची राहण्याची सोय होते. या मंदिरापासून थोड्याच अंतरावर गडावर जाण्यासाठी पायऱ्या लागतात. पायऱ्यांच्या वाटेत थोड्या चढाई नंतर छोटेशे हनुमान मंदिर लागते. येथून पुढे कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात, पावसाळ्याच्या दिवसात शेवाळ साचल्याने पायऱ्यावरून पाय घसरण्याचा धोका आहे त्यामुळे थोडं जपून चढावे. वाटेत उजव्या हाताला छोटीशी गुहा आणि त्यावर कोरीव पाण्याचे टाके आहे, मुख्य मार्गाच्या मागील बाजूस छोटीशी पायवाट कातळात कोरलेल्या खांब असेलल्या विशाल टाक्याकडे.
पुन्हा मुख्य मार्गाने पुढे गेल्यावर आपण प्रवेशद्वारा पाशी पोहोचतो, तुंग किल्ल्याचा प्रवेशद्वार गोमुखी रचनेचा आहे. दरवाज्यातून मागे वळून पाहिल्यावर तिकोना किल्ला आणि पवना धरणाचा विशाल जलाशय दिसतो. थोड्याश्या पायऱ्या चढून गेल्यावर दुसरा दरवाजा लागतो, येथील बुरुज बांधणी उल्लेखनीय आहे. येथून आत शिरल्यावर आपण गड माथ्यावर पोहोचतो. उजवीकडे गणेशाचे मंदिर आहे, मंदिरातील गणेश मूर्ती अतिशय रेखीव असून ती आयताकृती पिंडीवर विराजमान आहे. मंदिराच्या उजव्या बाजूस पाण्याचा तलाव असून समोरील बाजूस सदर आहे. गणेश मंदिराच्या मागील बाजूने बालेकिल्ल्यावर जाणारी वाट आहे. वाटेत उजव्या बाजूला अजून एक खोदीव टाके लागते. किल्ल्यावरील सर्व पाण्याचे टाकी चांगल्या स्थितीत असून पाणी पिण्यायोग्य आहे. बालेकिल्ल्यावर तुंगीदेवीचे मंदिर आहे. मंदिरा समोरच जमिनीत खोदलेली गुहा आहे. यात पावसाळासोडून इतर ऋतूत २ ते ३ जणांची राहण्याची सोय होऊ शकते.

तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मारुती मंदिरामागे आणि पूर्व दिशेला असलेल्या भैरवनाथाच्या मंदिरा शेजारी कातळात खोदलेल्या एकूण ५ गुहा आहेत. गुहा जास्त लांब असल्याने आतमध्ये भरपूर अंधार असतो, विजेची उपकरणे जवळ बाळगून त्या सर्व गुहा पाहता येतात. भैरवनाथ मंदिराशेजारी आणि तुंगवाडीतील प्राथमिक शाळेशेजारी अनेक विरगळ देखील पहावयास मिळतात.

सह्याद्री प्रतिष्ठाने जून २०१२ ते डिसेंबर २०१२ दरम्यान ऐतिहासिक वारसा जपला जावा यासाठी तुंग किल्ल्यावरील अनेक नष्ट झालेली बांधकामे बांधून पूर्ण केली आहेत. बांधकामासाठी लागणारे दगड, वाळू, विटा, खडी, सिमेंट, लोखंडी खांब आणि फरश्या प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः डोक्यावर घेऊन माथ्यापर्यंत नेल्या आहेत. हा सामान घेऊन जाण्याचा उपक्रम दर रविवारी केला जात असे. अशा अथक परिश्रमातून झालेल्या नवीन बांधकामामुळे तुंग किल्ल्याला नवे रूप प्राप्त झाले आहे. प्रतिष्ठान तर्फे तुंगी देवी मंदिरा शेजारी कायमस्वरूपी ३० फुटी लोखंडी ध्वज लावण्यात आला आहे. गणेश मंदिराचा जीर्नोधार करून त्यावर सिमेंट कोन्क्रीटचे छत (स्ल्याब) घालून मंदिराला संपूर्ण प्लास्टर आणि गाभाऱ्यात तसेच मंदिरा पुढे फरश्या बसवण्यात आल्या आहेत. किल्ल्याचा पहिला दरवाज्यापासून सुरु होणाऱ्या सर्व पायऱ्या पूर्णपणे नष्ट झालेल्या होत्या, पावसाळ्याच्या दिवसात गड चढणे अशक्य झाले होते परंतु नव्याने बांधलेल्या या सर्व पायऱ्यामुळे गड चढाई आता सोपी झाली आहे. गडाची पडलेल्या तटबंदीचे संपूर्ण संवर्धन केले गेले आहे, तसेच तुंग किल्ल्यावर वास्तू दर्शक व दिशा दर्शक फलक, किल्ल्याचा इतिहास व इतर माहितीचे फलक देखील प्रतिष्ठान तर्फे लावण्यात आले आहेत. या सर्व कामासाठी गावकऱ्यांनी मोलाची साथ दिली.

गडावर जाण्याच्या वाटा
या गडावर जाणाऱ्या सर्व वाटा पायथ्याच्या तुंगवाडीतूनच जातात. वाडीतून गडावर जाण्यास साधारणतः ४५ मिनिटे लागतात. गडमाथा तसा लहान असल्यामुळे एक दोन तासात सर्व गड पाहून होतो.

घुसळखांब फाटामार्गेः गडावर जाण्यासाठी लोणावळा स्टेशनवर पोहचावे. येथून भांबूर्डे अथवा आंबवणे कडे जाणारी एस.टी पकडून २६ कि.मी. अंतरावरील घुसळखांब फाट्यापाशी उतरावे. या फाट्यापासून दीड तासांची पायपीट केल्यावर आपण ८ कि.मी. अंतरावरील तुंगवाडीत पोहोचतो. येथून गडावर पोहचण्यास ४५ मिनिटे लागतात.

ब्राम्हणोलीकेवरे: अनेकजण तिकोना ते तुंग असा ट्रेक देखील करतात. यासाठी तिकोना किल्ला पाहून तिकोनापेठेत उतरावे आणि काळे कॉलनीचा रस्ता धरावा. वाटेतच ब्राम्हणोली गावं लागते. या गावातून लाँच पकडून पवनेच्या जलाशयात जलविहाराची मौज लुटत पलीकडच्या तीरावरील केवरे या गावी यावे. केवरे गावा पासून २० मिनिटातच आपण तुंगवाडीत पोहोचतो.

तुंगवाडीच्या फाटा मार्गेः
जर लाँच ची सोय उपलब्ध नसेल तर तिकोनापेठेतून दुपारी ११.०० वाजताची एस.टी. महामंडाळाची कामशेत-मोरवे गाडी पकडून मोरवे गावाच्या अलीकडच्या तुंगवाडीच्या फाटावर उतरावे. येथून पाऊण तासांची पायपीट केल्यावर आपणं तुंगवाडीत पोहचतो.

राहण्याची सोय: तुंगवाडीतील मारुतीच्या मंदिरात १० ते १२ जणांची राहण्याची सोय होते. तुंगवाडीत भैरोबाचे मंदिर आहे यात २० जणांना राहता येते. मंदिराशेजारीच असलेल्या वाडीतील प्राथमिक शाळेत देखील राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय: स्वतः करावी.
पाण्याची सोय: गडावर पिण्याच्या पाण्याच्या ३ टाक्या आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ: पायथ्यापसून ४५ मिनिटे.

किल्ल्यावरून दिसणारा आजूबाजूचा परिसर
लोहगड
विसापूर
तिकोना
मोरागड(मोरवे)
कोरीगड
पवना धरण
सहारा सिटी (Aamby Valley)

टीप
धुके नसेल तर सिंहगड, राजगड, तोरणा हे किल्ले दिसतात.

माहिती साभार: कुमार भवार.