कावळ्यागड / कैवल्यगड

डेक्कन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शोधलेल्या शिवपूर्व काळातील जासलोडगड उर्फ मोहनगड हा सध्या कावळ्या गड या नावाने प्रचलित असणारा जोडकिल्ला असावा, असा अंदाज शिवकालीन किल्ल्यांचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. प्र. के. घाणेकर यांनी वर्तवला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेल्या मोहनगडाचे नेमके ठिकाण शोधल्याचा दावा डेक्कन कॉलेजातील पूरातत्त्व विभागाचे अभ्यासक सचिन जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. वरंधा घाटात नीरा नदीच्या उगमाजवळ हा किल्ला आहे. जासलोडगड उर्फ मोहनगडाचा उल्लेख १३ मे १६५९ रोजी बाजीप्रभू देशपांडे यांनी लिहिलेल्या पत्रात येतो. हा किल्ला मावळात असून तो ओस पडल्याचे या पत्रात म्हटले आहे.

खुद्द शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकीदीर्त एकंदर जे ३६० किल्ले जिंकले त्याचा उल्लेख बखरीत असल्याचे घाणेकरांनी सांगितले.

मोहनगडाचा उल्लेख महाराजांच्या किल्ल्यात आहे हे बरोबरच आहे, असे सांगून घाणेकर म्हणाले की, ज्येष्ठ दिवंगत लेखक गो. नी. दांडेकर या किल्ल्यास प्रेमाने कैवल्यगड असे टोपण नाव देऊनही संबोधत असत. आपण म्हणत असणारा कावळा किल्ला हा मोहनगडाचाच एक भाग असावा, कारण असे अनेक जोडकिल्ले शिवकालात आढळतात. लोहगड-विसापूर , पुरंदर-वज्रगड जसे जोडकिल्ले आहेत, तसा कावळ्या किल्ला व मोहनगड हे जवळचे किल्ले असावेत, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

यासंबंधी दुसरी शक्यताही असून हा किल्ला महाराजांच्या ‘मायनर फोर्ट’ किवा दुय्यम महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी एक असावा, हे तिथे असणाऱ्या पाण्याच्या टाकीवरून काही प्रमाणात पटते, असे घाणेकर यांनी नमूद केले. हे किल्ले शिवकालातील चौक्यांचे काम बजावत असत. याठिकाणी किल्ला म्हणावा अशी कोणतीही तटबंदी अथवा बरुज नाहीत. टाकी असणारी अनेक ठिकाणे आहेत, म्हणून प्रत्येक ठिकाण हे किल्ला नाही, असे घाणेकरांनी स्पष्ट केले.

माहिती साभार: इंडिया टाईम्स मधील लेख.