दुर्लक्षित गुमतारा किल्ला - Durlashit Gumtara Fort

दुर्लक्षित गुमतारा किल्ला.
(श्रेणी: (चढाई)मध्यम
जिल्हा: ठाणे
तालुका: भिवंडी
उंची: १९४९फुट (मीटर ५८५) 
 =========================================================================================================
प्रस्तावना:- गुमतारा नामक किल्ला हा सध्या संशोधक व बऱ्याच दुर्गयात्री पासून दुर्लक्षित आहे. इतिहासाची पाने उलगडणारी व गडकिल्यांच्या वाटा भ्रमंती करणारे येथे सहसा फार कमी भेट देतात. घोटवड दुगाड या गावाच्या जवळ असलेल्या गहन जंगलात  हा किल्ला असून पायथ्याच्या गावाजवळ झालेल्या लढायांचा उल्लेख ऐतिहासिक कागद पत्रात सापडतो. किल्ल्याच्या पायथ्याशी लढाई झाल्याचे आढळते. तसेच संभाजी महाराजांच्या काळात या परिसराचा उल्लेख सापडतो.
गुमतारा किल्ला वसई ते वज्रेश्वरी रस्त्यावर वज्रेश्वरी मंदिरा पासून ४ किमी अंतरावर असलेल्या घोटवड गावाजवळ(खाली किल्यावर जाणाऱ्या आणखी वाटा दिल्या आहेत) एक उत्तुंग डोंगर आहे. त्या डोंगरावर गुमतारा किल्ला आहे. हा किल्ला टकमक किल्ल्याच्या दक्षिणेस २४ कि.मी. अंतरावर आहे. या किल्ल्यास घोटवडा, दुगाड किल्ला व गोतारा या नावाने सुद्धा संबोधले जाते. पेशवे काळात या किल्ल्यास गुमतारा असे म्हणत.
गुमतारा किल्ल्याच्या माथ्यावरून तुंगारेश्वर जंगल दिसते. तसेच किल्ल्याच्या दुष्टीक्षेपात कामणदुर्ग, टकमक व आशेरी किल्ले दिसतात. किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावरून  भिवंडीचा परिसर दिसतो. त्याकाळात या किल्ल्यावरून या परिसरावर लक्ष ठेवण्यात आले असावे. सध्या हा किल्ला दुर्लक्षित असून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. घोटवड पासून ४ कि.मी. अंतरावर प्रसिद्ध वज्रेश्वरी देवीचे मंदिर आहे. या मंदिराकडे वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. पर्यटकांनी देवीचे दर्शन घेऊन या दुर्लक्षित किल्यास भेट द्यावी अशी इच्छा व्यक्त करतो.
=========================================================================================================
भौगोलिक दृष्ट्या महत्व : भौगोलिकदृष्ट्या हा किल्ला गहन जंगलात आहे. किल्ल्याच्या १९४९ फुट एवढ्या उंचीवरून दिसणारे परिसर हे फार निसर्गरम्य आहे. या किल्ल्याच्या २४ किमी उत्तरेस टकमक गड,१६.९ किमी पूर्वेस माहुली गड, १२.८७ किमी दक्षिणेस कामाणदुर्ग आहे. समुद्री सपाटी पासून किल्याची उंची ५८५ मी. आहे. सभोलतालच्या उंच कड्यामुळे त्याला नैसर्गिक बळकटी प्राप्त झाली आहे. याची चढण मध्यम श्रेणीची आहे.
 =========================================================================================================
गुमतारा किल्याच्या घेऱ्यातील गावे : घोटवड, दुगाड, भिवाळी (उसगाव धरण), पिराची वाडी, तिल्हेर गाव, मोहिली गाव व वेढे वाडी ही गांव इतिहासाची साक्ष देत या किल्ल्याच्या कुशीत आहे.
=========================================================================================================
इतिहास: हा किल्ला कोणी बांधला हे ज्ञात नाही. या किल्ल्याच्या परिसराचा प्रथम उल्लेख इ.स.१६८९ मध्ये आढळतो.
इ.स.१६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराज पकडले गेल्याचे समजताच नाशिकचा मुघल सुभेदार मातबरखान नाशिकहून माहुलीवर चालून गेला आणि दोन तीन महिन्यात नाना युक्त्या करून त्याने मराठ्याच्या ताब्यातील माहुली, भिवंडी ,दुगाड, मलंगगड व शेवटी कल्याण हि सर्व ठिकाणे एका मागून एक कब्जात आणली.
गोतार हा उल्लेख पूर्वीच्या भिवंडी तालुक्याच्या नकाशात ही आहे तसेच याचा उल्लेख About twelve kilometres north of bhivandi rising gently form the west is the hill of Dyahiri (525 metres) across a saddle-back ridge lies
the OLD MARATHA FORT OF GOTARA (584 metres). असा आला आहे.
मार्चच्या सुरवातीत फिरंगणावरची मसलत मुऋर झाली. काही सहकारी चिमणाजी भिवराव, रामचंद्र हरी, कृष्णाजी केशव वैगरे सरदाराना त्यांनी साष्टी वसईकडे रवाना केले. त्याप्रमाणे १६ दिवसांनी म्हणजेच १६ मार्च १७३७ रोजी गुडीपाढवा करून दुसऱ्या दिवशी १७ मार्च १७३७ गुरुवारी रात्री त्यांनी स्वत: फिरंगणावर कूच केली. मराठयांच्या फौजेचे मुख्य दोन टोळ्या केल्या होत्या एक शंकराजी केशव फडक्याच्या हाताखाली व दुसरी खंडोजी माणकरांच्या हाताखाली, एकाच वेळी साष्टी व वसईवर हल्ला करण्याचा बेत ठरला. या दोन फौजेपैकी ठाण्यास जाणाऱ्या फौजेची बिनी खंडोजी माणकर व होनाजी बलकवडे, शंकराजी केशव वगैरे लोकांवर सोपवली होती.
साष्टीवर जाणाऱ्या फौजेने राजमाची (राजमाची किल्ला) खाली दब्यास बसावे व वसईत जाणाऱ्या फौजेने माहुली किल्याच्या रानात दब्यास बसावे असे ठरले व ठरल्या दिवशी गंगाजी नाईक याने आपले दोघे भाऊ व त्यांच्याबरोबर फकीर महंमद जमादार, धाकनाक परवारी व शिवाय १५० लोक आणि कोळी देऊन त्यास राजमाचीहून बावा मलंगच्या (मलंगगड) वाडीस रवाना केले व स्व:त आपली टोळी घेऊन तो घोटवड्याखालील कोशिंबड्यावर(कोशिंबडे गाव५) गेला.
आता वसईत पाठवलेली फौज माहुलीच्या रानात दब्यास बसली होती. २४ मार्च १७३७ रोजी गुरुवारी ती टोळी त्या रानातून बाहेर निघाली व पहाटेस २५ मार्च १७३७ रोजी घोटवड्याच्या रानांत आली. तो सबंध दिवस त्यांनी तेथे रानातच घालविला दिवस उन्हाळयाचे व प्रदेश अतिशय गर्मीचा त्या रानात पाण्याचा टिपूसही मिळण्याची मारामार त्यामुळे पाण्यावाचून हैराण होऊन त्या टोळीतले दोन चार लोक मेलेही. त्याच रात्री म्हणजेच शुक्रवारी लोक पुढच्या पल्यास निघाले ते पहाटे तुंगार कामणच्या रानात येऊन राहिले. तुंगार पासून पुढे त्यानी राजवळी येथे मुक्काम करून नंतर वसईच्या मोहिमेतील पहिला मोर्चा त्यांनी बहाद्दूरपूर येथे लावला. पुढे ही टोळी वसईच्या लढाईत सहभागी होऊन त्यांनी वसईवर विजय मिळविला.
या किल्याच्या पायथ्याशी असलेल्या दुगाड या गावी इ.स.१७८० (८ ते १२डिसेंबर) मध्ये मराठा सरदार रामचंद गणेश व इंग्रज सेनापती कर्नल हार्टले यांच्यात  झालेल्या लढाईत रामचंद्र गणेश हरी ठार झाले व मराठ्यांना पराभव पत्करावा लागला. तरी ब्रिटीश सैन्यातील लेफ्ट.ड्र्यू, लेफ्ट.कूपर, लेफ्ट.कोवन आणि लेफ्ट.पिअरसन हे सुद्धा ठार झाले होते.
मराठ्यांना मदत करणारा पोर्तुगीज अधिकारी सिग्रीअर नरोन्हा हा जबर जखमी झाल होता. रामचंद्र गणेश वीस हजाराची फौज घेऊन ब्रिटीशांवर चाल करून आला होता. दुगाड परिसरात या लढाईत वापरण्यात आलेले तोफा व दगडी तोफगोळे आढळतात.
=========================================================================================================
किल्याचे स्वरूप: ज्या टेकडीवर हा किल्ला बांधला आहे ती स्वत सिद्धच अतिशय अवघड आहे.ज्या ठिकाणी शत्रूवर चढून येण्याची भीती होती तेथे तटबंदी घालून निट बंदोबस्त केलेला होता. परंतु १८१८ मध्ये ह्या तटबंदीच्या पुष्कळ ठिकाणी दगडांच्या राशी पडलेल्या होत्या. किल्ल्याचा दरवाजा टेकडीच्या माथ्यापासून ४०० फुट उंचीवर एका अरुंद व एक सारख्या तुटक गेलेल्या अश्या व्हालीच्या (खिंड)(निसरडी उतरती बाजू)  तोंडाशी होता. हल्ली या ठिकाणी मात्र थोडा तटबंदीचा अवशेष भाग दुष्टीस पडतो. या दावाज्याच्या शेजारी खडकांत खोदलेली ७ पाण्याची टाकी आहेत. पूर्वी गडकरी लोकांस या पाण्याचा पुरवठा या टाक्यातून होत असे.
=========================================================================================================
किल्यावरील अवशेष : या किल्याचेबालेकिल्ल्याच्या क्षेत्रफळ जवळपास चार ते साडेचार एकर एवढे आहे.सध्यास्थितीत म्हणजे फेब्रुवारी २०१६ मध्ये पुढील प्रमाणे किल्ल्याची स्थिती दिसून येते..
१.पाण्याचे कोरीव ७ टाके दगडात कोरलेले आहेत. त्यापैकी एका टाकीत पाणी आहे. पाणी असलेल्या टाकीची खोली ६ फुट असून रुंदी ६.५ फुट आहे व लांबी ८ फुट आहे. इतर टाक्या पूर्णपणे मातीने बुजला आहेत. त्या टाक्यांची लांबी ८ फुट लांब व ५ फुट रुंद आहेत.(सह्याद्री प्रतिष्ठानने टाके सफाई व किल्याचा माहिती व नकाशा फलक किल्यावर लावलेला आहे)
२.वाड्याचे (जोते) भग्न अवशेष अंदाजे १८ फुट लांब व १२ फुट रुंदीत एवढे पसरलेले आहे. तसेच आणखी लहान लहान जोत्यांचे अवशेष बालेकिल्ल्यावर आहेत.
३.किल्ल्याचा दरवाजा गोमुखी आहे. तटबंदी हि पदरयुक्त आहे. त्याचे दोन्ही बुरुज सध्या १३ ते १४ फुट पडक्या स्थितीत आहेत. दरवाजा पूर्णपणे नामशेष झाला आहे. दरवाजाचा उंबरठा तेवढा पाहण्यास मिळतो व दरवाजाच्या समोर तटबंदी व बुरुजाचे दगड अस्ता व्यस्त पडलेले आहेत.
४.किल्ल्याची तटबंदी हि कातळी दगडात तासून कोरीव काम करून बांधलेली आहे.
५.दरवाज्याच्या वरच्या बाजूने पुढे चालत गेले असता पुढे एक सुस्थितीत असलेला बुरुज आहे त्याची उंची साधारण २४ ते २५ फुट आहे.
६.किल्ल्याच्या पश्चिमेस थोडेसे खालच्या बाजूस उभ्या असलेल्या कातळात मोठ्या दगडांत बारमाही जलस्त्रोत आहे.(सह्याद्री प्रतिष्ठानने राबवलेल्या दुर्ग संवर्धन मोईमेत १८ जुलै व ११ ऑक्टोबर २०१५ रोजी या जलस्त्रोत्र परिसरातील जागा स्वच्छ करून तेथे दिशा दर्शक लावले आहेत.)
७.किल्यावर कोरीव टाक्यांच्या वर बालेकिल्ल्या कडे जाणाऱ्या वाटेवर एक लहान मंदिर आहे या मंदिरा जवळ जाणाऱ्या चार ते पाच पायऱ्या कातळात कोरलेल्या आहेत.
 =========================================================================================================
किल्याकडे जाणारे रस्ते : किल्ल्यावर पोहचण्यासाठी ४ वाटा आहेत.
१.एक वाट प्रसिद्ध वज्रेश्वरी मंदिरा पासून १ किमी अंतरावर असलेल्या भिवाळी गावापासून हायवे जवळ उसगाव धरणातून जाते. येथून किल्ल्यावर पोहचण्यासाठी ३ तास लागतात.
२.दुसरी वाट ही घोटवडा(घोट्गाव) मधील गोठण पाडा गावातून जाते येथून किल्ल्यावर पोहचण्यासाठी अडीच ते ३ तास लागतात.(सह्याद्री प्रतिष्ठानने मुख्य हायवे पासून घोटवड(घोट्गाव) गोठण पाडा गावातून किल्यावर जाणाऱ्या वाटेवर दिशा दर्शक दाखवले आहेत.)
३.तिसरी वाट ही दुगाड गावातून पिराची वाडी येथून जाते येथून अडीच ते तीन तास लागतात. हि वाट थोडी अवघड व निसरडी आहे.
४.चौथी वाट भिवंडी वाडा रोड वरील दुगाड फाट्यापासून ५ किमी अंतरावर मोहिली गाव आहे.येथून किल्ल्यावर पोहचण्यास साधारण दीड ते दोन तास लागतात. या वाटेवर गावापासून दिशा दर्शक फलक लावलेले आहेत
(पर्यटकांनी आपल्या सोई नुसार वाट निवडावी मदत लागल्यास प्रतिष्ठानच्या सदस्याशी संपर्क साधावा
श्री अमोल पाटील ९८२३१६६१०४,श्री दत्ता खैमोडे ९८९०१४९३३५,श्री प्रशांत देशमुख ९२७१९४३३३९)
एस टी बस प्रवास
१.वज्रेश्वरी मंदिर – वज्रेश्वरी वरून रिक्षा उपलब्द आहेत.मोहिली गावात जाण्यासाठी सैतानी पूल –घोटगाव– वेढे पाडा- वेढे गाव- दुगाड- मोहिली गाव.
२.मुंबई – पश्चिम रेल्वेने वसई किवा विरार रेल्वे स्थानक गाठावे येथून अर्धा पाऊन तासाने बस वज्रेश्वरी मंदिराकडे जाणारे बस आहेत बसने १ तासात तुम्ही वज्रेश्वरी मंदिर येथे उतरावे व तेथून रिक्ष्याने मोहिली गावात पोहचता येते.
किवा वसई विरार वरून –कल्याण भिवंडीला जाणाऱ्या बस मार्गे दुगाद फाटा वर उतरून तेथून ५ किमी अंतरावर मोहिली गावात जाता येते.
३.ठाणे-कल्याण- ठाणे कल्याण वरून एस टी बस उपलब्द आहे. वाडा,भोईसर,डहाणू,पालघर,गणेशपुरी या सर्व बस भिवंडी मार्गे जातात येथून दीड तासात दुगाड फाटावरून ५ किमी मोहिली गाव आहे.
४.पुणे- पुणे वरून येणाऱ्या शिवप्रेमींनी कल्याण-ठाणे या मार्गे एस टी बस ने प्रवास करू करावा.
 =========================================================================================================
किल्ले गुमतारा नकाशा सूची
१.नैसर्गिक जलस्त्रोत –(दोन दगडांच्या मधील बारमाही पाण्याचा झरा)
२.ताशिव तटबंदी – (साधारण १५० फुट लांब)
३.भग्न दरवाजा – (या ठिकाणी फक्त दरवाज्याचा उंबरठा आहे)
४.बुरुज – (मुळ बुरुज २४ ते २५ फुट उंच असलेला गोलाकार बुरुज आता १४ ते १५ फुट भग्न अवस्थेत आहे.)
५.पदरयुक्त तटबंदी – (साधारण ३५० फुट लांब तटबंदी)
६.कोरीव पाण्याचे टाके – (येथे एक ८ फुट लांब व ५ फुट रुंद खोली ८ फुट एवढी आहे व उर्वरित टाके मातीने बुजले आहेत.)
७.टाके – (६फुट लांब व ४ फुट रुंद मातीने बुजले आहे)
८.जोते-(भग्न वाड्याचे अवशेष) –(१८फुट लांब व १२ फुट रुंद)
९.बुरुज (२४फुट उंच गोलाकार आहे)
१०.बालेकिल्ला (क्षेत्रफळ साधारण चार ते साडेचार एकर)
११.तुटक तटबंदी –(४५ मीटर लांब)
१२.जोते-(भग्न वाड्याचे अवशेष) ९फुट लांब व ६फुट रुंद) व लहान मंदिर
१३.भिवाळी गाव (वज्रेश्वरी मंदिरापासून १ किमी अंतरावर आहे)
१४.खडकी (किल्ल्यापासून दीड तास अंतरावर डोंगरावर आहे साधारण १२ ते १६ किमी)
१५.दुगाड गाव (वज्रेश्वरी मंदिरापासून ८ किमी अंतरावर)
१६.घोटवड गाव (वज्रेश्वरी मंदिरापासून ४ किमी अंतरावर)
१७.मोहिली गाव (दुगाड फाट्या पासून २ किमी अंतरावर)
१८.पिराची वाडी (हि वाडी दुगाड गावातच आहे)
१९.मंदिर
 =========================================================================================================
(सह्याद्री प्रतिष्ठानने या किल्यावर जवळपास १० हून अधिक  दुर्ग संवर्धन मोहिमा घेऊन श्रमदान केले आहे. किल्यावर जाणाऱ्या अवघड वाटा सोयीस्कर करणे,टाके स्वच्छता,दिशा दर्शक नकाशा व इतिहास माहिती फलक (मुख्य हायवे पासून बाले किल्ल्या पर्यंत),दरवाजा वरील दगड व बुरजावरील योग्य ठिकाणी ठेवणे,किल्याच्या आजूबाजूच्या परिसरात वृक्षा रोपण करणे,किल्यावर नैसर्गिक जलस्त्रोत्र पासून बालेकील्या पर्यत दिशा दर्शक दाखवून किल्यावर बाराही महिने पाणी साठा उपलब्ध आहे हे शिवप्रेमी पर्यंत पोहचवले, आजूबाजूच्या दहा गावामध्ये किल्याच्या माहितीचे पत्रक(पाम्प्लेत) वाटण्यात आले,भिवंडी मधील प्रसिद्ध वज्रेश्वरी मंदिर येथे किल्याचा माहिती व नकाशा फलक लावण्यात आला आहे.तसेच मंदिराच्या ट्रस्टी श्री अरुण शेवाळे यांनी मंदिर परिसरात किल्याचा नकाशा व माहिती फलक लावण्याची परवानगी दिली व स्थानिक शिव्प्रेमिंनी मोहिमेत सहभागी होऊन प्रचंड प्रतिसाद दिला आहे. स्थानिक गावकऱ्यासोबत दुर्ग संवर्धन व स्थानिक ग्रामपंचायत सदस्य यांना किल्याच्या पर्यटना विषयी महत्व समजावून बैठका घेण्यात आले. वन विभाग व भूमी लेख अधिकारी यांनी कामाची पाहणी करून पुढील कार्याला सहकार्य करण्याची ग्वाही दिली. किल्यावर जर गिर्यारोहक किवा पर्यटक यांना आपात्कालीन स्थितीत मदत करण्यासाठी (रेस्कू ऑपरेशन) या साठी भिवंडी विभागातील पदाधिकारी सज्ज असून त्यांचे संपर्क क्रमांक पायथ्याशी फलकावर देण्यात आले आहेत. या किल्याची डागडुजी करून हा किल्ला महाराष्ट्रातील तसेच देश भरतील लोकापुढे पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.किल्याच्या नकाशा पासून किल्यावर जाणाऱ्या चारही वाटावर दिशा दर्शक लावले अवघड वाट सोपी केली अनेक वृत्त वाहिनी प्रिंट मिडिया तसेच जिल्हाधिकारी वन विभाग यांनी या कार्याची दखल घेतली. तसेच या किल्याचा इतिहास संशोधन करून मुंबई इतिहास संशोधन मंडळ यांच्या त्रैमासिकात प्रसिद्ध करून महाराष्ट्रभर किल्याच्या इतिहासाला पोहचवण्याचे एक लहान काम केले आहे. अनेक दिवाळी अंक व ब्लॉग वृत्त पत्रातील सविस्तर लेख देण्यात आले. सोशल मिडिया गुगल द्वारे किल्याचा इतिहास लेख पाहून आजवर ७० हून अधिक गिर्यारोहक,पर्यटक व स्थानिक परिसरातील शिव प्रेमींनी किल्याला भेट दिली. तसेच परदेशातूनहून नागरिकांनी या किल्ल्याला पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
सह्याद्री प्रतिष्ठान भिवंडी विभागाने संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री.श्रमिक गोजमगुंडे सर व संस्थेचे कार्यकारी
अध्यक्ष आ.संजय केळकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमा राबवल्या व वर्षभर या किल्यावर होणाऱ्या कामाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. (सह्याद्री प्रतिष्ठान भिवंडी विभाग सदस्य श्री अमोल पाटील,श्री दत्ता खैरमोडे, श्री प्रकाश मोरे श्री राम गवारी श्री.प्रशांत देशमुख श्री.संदेश भोईर श्री.लक्ष्मण भावर श्री.दीपक पुजारी) तसेच सह्याद्री प्रतिष्ठान दुर्ग संवर्धन विभागा अंतर्गत दुर्ग संवर्धन मोहिमेत सहभागी झालेले सर्व सदस्य.
(आपण सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्याचा मागोवा आमच्या वेब साईट वर घेऊ शकता व आपल्याला आमच्यासह शिव कार्यात सहभागी होण्याची इच्छा असल्यास आपण आपले नाव नोंद करू शकता)
 =========================================================================================================
विशेष आभार
दुर्ग महर्षी श्री प्रमोद मांडे,इतिहास संशोधक डॉ श्री.श्रीदत्त राऊत,सह्याद्री प्रतिष्ठान कार्याध्यक्ष श्री सचिन शेडगे,मावळ तालुका अध्यक्ष श्री राज बलशेटवार, इतिहास संशोधन मंडळ मुंबई संचालक डॉ प्रकाश खोबरेकर,ठाणे ग्रंथ संग्रहालय वाचनालय मुख्य कु.प्रणाली कोबळ,महाराष्ट्र पुराभिलेख विभाग सौ साळुंखे बाई
 =========================================================================================================
श्री गणेश दत्ताराम रघुवीर 
(९७७३६९४८७७)
इतिहास अभ्यासक
अध्यक्ष दुर्ग संवर्धन विभाग,
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र,राज्य