अनघाई किल्ला – Anghai Fort

किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग
डोंगररांग: लोणावळा
चढाई श्रेणी: मध्यम
जिल्हा: पुणे
तालुका: मावळ

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात, किल्ले कोरलाई शेजारी अनघाई डोंगरावर अनघाई किल्ला आहे त्यास अनघाई देवीचा किल्ला असेही म्हटले जाते.

डोंगर माथा चढून गेल्यावर अनघाईच्या सुळक्याच्या उजवीकडील (दक्षिणेकडील) खिंडीतून सुळक्यावर वाट आहे, खिंडीच्या थोडं आधी कातळात खोदलेली, कोरलेली चौकोनी मेट आहे. पूर्वीच्या काळी गडाच्या थोड्या खालच्या उंचीवर वाटेजवळ टेहेळणीकरता अशी मेटं उभारली जात.
खिंडीच्या पुढे कातळात ५-६ फुट उंचीवर वर चढण्यासाठी खाचा केलेल्या आहेत, थोडेसे कातळारोहण केल्यावर खोदीव पायऱ्या लागतात. समोरच एकावर एक खोदलेल्या दोन टाकी आहेत, डाव्या बाजूला अनघाई देवीचं छोटेखानी मंदिर आहे.

किल्ल्यावर पाण्याचे सलग तीन हौद आहेत, यातील पाणी पिण्यायोग्य आहे. पुढे गेल्यावर काही उखळ, खांब रोवण्याकरता असलेले खड्डे दृष्टीस पडतात. किल्ल्यावर पूर्वीच्या काही वास्तू असाव्यात, आज फक्त पाया शिल्लक आहे. अनघाई किल्ल्याचा वापर टेहळणी साठी होत असावा.