अचलपूर किल्ला / एलिचपूर – Achlpur / Ellichpur Fort

‘अचलपूरचा इतिहास म्हणजेच वऱ्हाडचा इतिहास’ असा अभिमानपूर्वक उल्लेख ज्या शहराबद्दल केला जातो, ते अचलपूर (आणि परतवाडा). या शहरातील ऐतिहासिक वास्तूंमुळे गतकाळातील वैभवाची साक्ष पटते. पौराणिक काळात जैन धर्मातील इल नावाच्या राजाने हे नगर वसवल्याने त्याला ‘एलिचपूर’ असे नाव पडले. आज ते अचलपूर या नावाने परिचित आहे.
एलिचपूर ते अचलपूर या शेकडो वर्षांच्या प्रवासात या नगराने इतिहासाला कलाटणी देणाऱ्या अनेक घटना अनुभवल्या. मुस्लिम राजवटीत नबाबांचा थाट या शहराने पाहिला. मराठय़ांच्या विरोधात इंग्रजांनी सैनिकी व्यूहरचना याच शहराबाहेरून आखली. कापड आणि रेशीम उद्योगाचा सुवर्णकाळ पाहणाऱ्या या शहरात नंतर या व्यवसायावर अवकळा आल्याचेही लोकांना दिसले. सुंदर बागांनी नटलेल्या शहरातील बगिचे नाहीसे झाले. अमरावती जिल्ह्य़ातील सर्वात मोठे तालुक्याचे शहर म्हणून या शहराची ओळख असली तरी अचलपूर जिल्ह्य़ाचे मुख्यालय बनावे, ही अनेक वर्षांची मागणी केव्हा तरी पूर्ण होईल, अशी अपेक्षा अचलपूरकर बाळगून आहेत.
अचलपूरच्या सभोवताली असलेला परकोट आणि चार भव्य दरवाजे या शहराच्या गतवैभवाचे दर्शन घडवतात. दुल्हा दरवाजा, तोंडगाव दरवाजा, बुंदेलपुरा दरवाजा आणि हिरापुरा दरवाजा, अशी या द्वारांची नावे आहेत. एलिचपूर ही एकेकाळी विदर्भाची राजधानी होती. त्याकाळी तब्बल ४० हजार घरे शहरात होती. मुस्लिम राजवटीत अचलपूर शहरात ५४ वस्त्या होत्या. त्या वस्तीला तेव्हा पुरा म्हणत. आजही ३५ च्या वर ‘पुरे’ अस्तित्वात आहेत. मुस्लिम नबाबांच्या नावावर या पुऱ्यांची नावे आहेत. समरसखानने (१७२४) वसवला तो समरसपुरा, सुल्तानखानने (१७२७) वसवला तो सुल्तानपुरा, सलाबतखान याची पत्नी अन्वरखातून हिच्या नावावरून अन्वरपुरा, नामदार गंज, नसीबपुरा, अब्बासपुरा, अशी या वस्त्यांना नावे देण्यात आली.
देवगिरीच्या यादवांचा कालखंड संपल्यानंतर व १३४७ मध्ये बहामनी सत्तेचा उदय होईपर्यंत नरनाळा आणि गाविलगड या किल्ल्यांसह वऱ्हाड प्रांत हा दिल्लीचा बादशहा मोहम्मद तुघलक याच्या अधिपत्याखाली होता. यावेळी बादशहाचा जावई इमाद उल मुलूकहा वऱ्हाड आणि खान्देशचा सुभेदार होता. या परिसराचा कारभार तो एलिचपूरहूनच पाहत असे, असा उल्लेख ‘गुलशने इब्राहमी’ या ग्रंथात सापडतो. त्याकाळी एलिचपूर हे महत्त्वाचे ठिकाण होते, हे लक्षात येते पण, या नगरीचा इतिहास त्यापेक्षाही जुना आहे.
बहामनी सत्ताकाळात १३९९ मध्ये आठवा सुल्तान फिरोजशहा बहामनी याला एका मोहिमेसाठी अचलपूरला यावे लागले होते. खेडल्याचा राजा नरसिंगराय आणि फिरोजशहा यांच्यातील युद्धानंतर नरसिंगराय शरण आला, तेव्हा तो सुल्तानाच्या भेटीसाठी अचलपूरच्या छावणीतच थांबला होता, यावरून त्या काळातील एलिचपूरचे महत्त्व लक्षात येते. १४२५ पर्यंत अचलपूर हे मुस्लिम सत्तेतील महत्त्वाचे ठिकाण होते. त्यानंतर इमादशाहीत म्हणजे १४९० ते १५७४ पर्यंत वऱ्हाडातील स्वतंत्र इमादशाहीचा कारभार हा गाविलगड, नरनाळा या किल्ल्यांमधून सांभाळला गेला. बरीच वर्षे अचलपूरचा ‘वास्तू इतिहास’ कोराच राहिला. तरीही अचलपूरचे महत्त्व कमी झालेले नव्हते. १५७४ ला वऱ्हाड प्रांत हा निजामाकडे आला. निजामशाहीतही हे शहर महत्त्वाच्या घडामोडींचे साक्षीदार ठरले. सुमारे २६ वष्रे निजामशाहीत राहिलेला वऱ्हाड प्रांत १५९८ मध्ये अकबराच्या स्वारीनंतर मोगल साम्राज्यात समाविष्ट झाला. अबूलफजल हा वऱ्हाडचा सुभेदार बनला. मोगलांची सत्ता संपूर्ण शतकभर होती. मोगल दरबाराच्या बातमीपत्रांमध्ये एलिचपूर व संबंधित किल्ल्यांचे उल्लेख सापडतात. २ एप्रिल १६९४ च्या नोंदीनुसार एलिचपूर हे सरकारी खजिना ठेवण्याचे ठिकाण होते. ११ मे १७०३ च्या बातमीपत्रात अजून एका महत्त्वाच्या घटनेचा उल्लेख आहे. त्यात मराठय़ांचे सैन्य वऱ्हाडची राजधानी असलेल्या एलिचपूरवर चाल करून आले व त्यांनी मोगलांचा नायब सरअंदाज खान याच्याकडे चौथाईची मागणी केली. त्यावेळी सुभेदार उमाद तुल्मुक्तखान फिरोजजंग हा होता. मोगल काळातच मराठय़ांनी वऱ्हाड जिंकण्यासाठी अनेक स्वाऱ्या केल्या.
१६९८ मध्ये शिवाजी महाराजांचे वंशज राजाराम यांनी वऱ्हाड प्रांत जिंकला. नंतर शाहू महाराजांनी परसोजी भोसले अमरावतीकर यांना वऱ्हाड प्रांताची जहागिरी दिली. १७४४ ते १७५० पर्यंत हा भाग निजामांच्या ताब्यात गेला पण, नागपूरचे रघुजी राजे भोसले यांनी त्यांचे पुत्र मुधोजी यांना पाठवले होते. काही काळ एलिचपूर हे मुधोजींच्या ताब्यात होते. नंतर १८०३ मध्ये नागपूरकर भोसले आणि इंग्रजांमध्ये युद्ध झाले. या युद्धानंतर वऱ्हाड इंग्रजांच्या ताब्यात गेला, हा इतिहास आहे.
मोहम्मद तुघलकाचा पुतण्या सुल्तान इमाद-उल-मुलूक याने १३४७ मध्ये इदगाह उभारली. या इमारतीच्या पायऱ्यांवरून त्यावेळी गाविलगडचा किल्ला दिसत होता, असा इतिहासात उल्लेख आहे. १०८ खांबांची आणि १५ मीटर उंचीची जुम्मा मशीद ही पारंपरिक पद्धतीने बांधण्यात आली, ही भव्य मशीद उभारण्याचे श्रेय औरंगजेबच्या काळातील नवाब अलीवर्दीखान याच्याकडे जाते.
शहराच्या बाहेरील परकोट हा सुल्तानखानचा मुलगा नवाब इस्माईलखान याने बांधला. नबाबाचा महाल आणि देवडी ही बहिलोलखान व सलाबतखान याने बांधली. बालाजी तसेच, श्रीरामाचे देऊळ, शहा इस्माईलखाँ या फकिराचे थडगे नागपूरचे माधोजी भोसले यांनी बांधले. अचलपूरपासून तीन किलोमीटर अंतरावरील हौज कटोरा ही वैशिष्टय़पूर्ण षट्कोणी इमारत अहमद शहावली बहामनी याने बांधली. सुमारे १०० मीटर व्यासाच्या तलावात ८१ फूट उंचीची तीन मजली इमारत उभारण्यात आली. पूर्वी ही इमारत पाच मजली होती. त्यातील तिसरा आणि चौथा मजला पाडून त्याच्या दगडांपासून नबाबाने त्याचा राजवाडा बांधला, असे सांगितले जाते पण, ही आगळी वेगळी जीर्ण अवस्थेतील वास्तू आडवाटेने येणाऱ्या पर्यटकांचे आजही लक्ष वेधून घेते. गुलाम हुसैन खान याने इमामवाडा बांधला. त्याच्याच काळात बेबहा बाग बांधण्यात आली. या ठिकाणी इस्माईल खान याचे थडगे आहे. या परिसरात अनेक छोटी मोठी थडगी आहेत पण, या वास्तूचे सौंदर्य वेगळेच आहे. जाळीदार खिडक्या, नक्षीकाम केलेले दरवाजे यामुळे ही वास्तू प्रेक्षणीय बनते पण, सध्या ही वास्तू भकास बनली आहे. नावालाच ही बाग उरली आहे. या बागेत केवळ झुडपे, काही इमारतींचे भग्नावशेष आणि आत प्रवेश केल्यानंतर जाणवणारे भकासपण. ही वास्तू खाजगी मालमत्ता असल्याचा एक फलक दरवाजावर लावण्यात आला आहे पण, या जागेचा वापर या ठिकाणी मिळणारा एकांत पाहून नको त्या कामांसाठी केला जात असल्याचे या भागातील रहिवासी सांगतात.
अचलपूर आणि परतवाडा या दोन शहरांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी अजूनही योग्य ते नियोजन झालेले नाही पण, शेकडो वर्षांपूर्वी बहामनी सत्ताकाळात खापरी नळ बांधून शहरभर पाणी पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बिच्छन नदीवर त्यासाठी एक धरणही बांधण्यात आले होते, असा उल्लेख ‘गॅझेटियर’मध्ये आहे. आता हे नळ बंद असले तरी त्याचे अवशेष आणि जागोजागी टाक्या अजूनही कायम आहेत. त्याला ‘सातभुळकी’ म्हणतात. या गतवैभवावर चर्चा करणेच आता अचलपूरकरांच्या नशिबी आले आहे. दोन्ही शहराची तहान पूर्णपणे भागवू शकेल, अशी पाणीपुरवठा योजना अजूनही अस्तित्वात आलेली नाही.