इ.स. १८०६ मध्ये निजामसरकारने अमरावतीकरांच्या रक्षणाकरीता एक दगडी परकोट बांधण्यास मंजूरी दिली होती हे आपणास माहित असेलच. या परकोटाचे बांधकाम इ.स. १८०६ मध्ये सूरु झाले. व नंतर या परकोटाचे बांधकाम इ.स. १८०६ ते इ.स. १८२१ मध्ये पूर्ण झाले. सोळा ते सतरा वर्षानंतर बांधण्यात आलेल्या या दगडी परकोटाला चार लक्ष रुपये खर्च आला होता असे म्हणतात.
अमरावतील हा दगडी परकोट दोन मैल लांब असून, या परकोटाच्या भिंती २० ते २६ फ़ुट उंच आहेत. तसेच या परकोटास एकूण पाच महाद्वारे असून चार लहान खिडक्या आहेत. ही पाच महाद्वारे म्हणजे ‘अंबागेट’, ‘महाजनपुरीगेट’, ‘भुसारीगेट’, ‘नागपुरीगेट’ व ‘खोलापुरीगेट’ अश्या प्रकारची आहेत. स्वतंत्र प्राप्तीनंतर या महाद्वारातील भुसारीगेटला “जवाहरगेट” असे नाव देण्यात आले होते.वरील परकोटावरील चार खिडकीपैकी एकीस ‘माताखिडकी’ व दुसरीस ‘खुनारीखिडकी’ असे म्हणतात. या परकोटावरील या दोन खिडक्या सोडून आणखी दोन खिडक्या आहेत त्यातील पहिलीला ‘पटेलखिडकी’ व दुसरीला ‘छत्रपुरीखिडकी’ असे म्हणतात. अमरावतीमधील हा दगडी परकोट अतिशय भव्य स्वरुपाचा असून येथील प्रत्येक महाद्वाराचे काम पाहण्यासारखे होते. ही प्रत्येक महाद्वारे रात्रीच्यावेळी बंद केली जात असत व सकाळी पुन्हा उघडली जात असत. निजामाच्याकाळात येथिल प्रत्येक महाद्वारावर शिपाई असायचे. परकोटावरील ही महाद्वारे बंद केल्यावर पादचाऱ्यांना आत घेण्याकरीता या खिडकींचा उपयोग करण्यात येत होता.
आता मात्र या परकोटाचे पूर्ण स्वरुप बदललेले असून या परकोटाचे बांधकाम अतिशय भंगलेले आहे त्यामुळे ही जूनी वास्तू खचू नये म्हणून म.न.पा. ने या परकोटाच्या सौंदऱ्यीकरणाचे काम आपल्या हाती घेतले होते. ते भविष्यकाळात लवकरात लवकर पूर्ण होईल असा विश्वास वाटतो, या दगडी पराकोटावर रोषणाईचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे अंबानगरीतील हा जुना दगडी परकोट अतिशय भव्य व सुंदर स्वरुपाचा दिसत आहे.