उंची: ११०० फुट
प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: सातपुडा
चढाईची श्रेणी: सोपी
जवळचे गाव: चिखलदरा
जिल्हा: अमरावती
गाविलगड हा किल्ला चिखलदर्या जवळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधे आहे. किल्ल्याच्या भवती घनदाट जंगल आहे. १२ व्या / १३ व्या शतकात गवळ्यांनी बांधलेला हा किल्ला नंतर बलाढ्य़ गोंडानी घेतला. गाविलगड ह किल्ला विदर्भाचे भूषण आहे. गाविलगडाचा किल्ला गिरीदुर्ग प्रकारचा असून तो अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यामध्ये आहे.

इतिहास
महाभारतात भीमाने किचक राक्षसा बरोबर लढाई करून त्याचा इथे वध केला व बाजूच्या दरीत फेकून दिले अशी नोंद आहे. किचकाची दरी म्हणजे किचकदरा. चिखलदरा हा किचकदरा या शब्दाचा अपभ्रंश आहे. इ.स. १८०३ मध्ये दुसर्या मराठे-इंग्रज युद्धात या किल्यावर महत्त्वपूर्ण लढाई झाली होती. आर्थर वेलस्लीच्या इंग्रज सैन्याने मराठ्यांचा निर्णायक पराभव केला.
गाविलगडाचे हे वैभवशाली बांधकाम पहाताना सहाजिकच त्याचा इतिहास आपल्या समोर येतो. हा भाग बहमनी सुलतानांच्या ताब्यात होता. तत्पुर्वी या डोंगरावर गवळी लोकांना मातीचा कोट उभारला होता, अशी वंदता आहे. बहमनी सुलतानाच्या काळात सातपुड्याच्या संरक्षणासाठी शहाबुदीन अहमदशहाने हा बलदंड किल्ला बांधून उत्तरेकडून होणाऱ्या आक्रमणाला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. पुढे हा किल्ला औरंगजेबाकडे आला. नंतरच्या काळात हा भोसल्यांच्या ताब्यात असताना यावर बेणीसिंह नावाचा किल्लेदार होता. त्यावेळी झालेल्या इंग्रजांबरोबरच्या युद्धात बेणीलिंगाने अतुलनिय पराक्रम केला. त्याच्या या पराक्रमाची प्रशंसा जनरल सर जेस्पर निकोल्स यांनी आपल्या नोंदवहीत करून ठेवली आहे.
गडावरील ठिकाणे
किल्ल्यावर निजामकालीन कोरीव मूर्ती पाहण्यासारख्या आहेत. गडावर २ तलाव आहेत. साधारणत: १० तोफा नाजुक स्थितीमधे अजूनही शाबुत आहेत. घोडे, हत्ती इत्यादींचे कोरीव काम व हिंदुस्तानी, उर्दू, अरबी या भाषांमधील मजकूर तोफांवर आढळतो.
मात्र किल्ल्याची तटबंदी, बुरूज ढासळण्याच्या मार्गावर आहेत. किल्ल्याच्या आतील राणीमहाल, दरबार व तलाव आजही तत्कालीन वैभवाच्या खुणा जपून आहेत. या किल्ल्यापासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेला आमनेर येथील छोटा किल्ला म्हणजे विदर्भाचे प्रवेशद्वार; मात्र तोही दुर्लक्षित आहे.
शार्दुल दरवाजाचे भव्य आणि भक्कम बांधकाम आपल्याला चकीत करते. दरवाजावरील शार्दुलाची शिल्पे पहात रहावी अशीच आहेत. लांबरुंद पायऱ्यावरुन आपण दरवाजामधून प्रवेश करतो. आतील पहारेकर्यांच्या जागा, घुमट पाहून पुढे चालू लागतो. पुन्हा एक दरवाजा लागतो. हा दरवाजा म्हणजे चवथा दरवाजा आहे. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर गडाचा मुख्य असा दिल्ली दरवाजा आपली वाट अडवून उभा असतो. हा या मार्गावरील पाचवा दरवाजा आहे. या भव्य दरवाजाच्या आतल्या बाजूला पहारेकर्यांच्या निवासाचे कक्ष आहेत. दरवाजाला लागूनच असलेले अशाप्रकारचे भव्य बांधकाम महाराष्ट्रातील इतर किल्ल्यावर आढळत नाही.
जाण्याचे मार्ग
मध्य रेल्वेचे बडनेरा हे जवळचे स्थानक ११० कि.मी. वर आहे. मुंबई पासूनचे अंतर ७६३ कि.मि आहे. एस टी महामंड्ळाच्या गाड्या अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर इथून नियमीत सुटतात.चिखलदर्यापासून गाविलगडाचा बलदंड किल्ला दोन कि.मी. अंतरावर आहे. चिखलदरा येथे पोहोचण्यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत. त्यापैकी एक जळगाव, भुसावळ, बुर्हाणपूर कडून धारणी हरिसाल, सेमाडोह ते चिखलदरा हा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत असल्यामुळे हा गाडीरस्ता सुर्यास्त ते सुर्योदय या रात्रीच्या वेळेस बंद करण्यात येतो.
दुसरा मार्ग अमरावती, अचलपूर, परतवडा, ते चिखलदरा असा आहे. या मार्गावर धामनगाव गढी ते चिखलदरा हा घाटरस्ता आहे. चिखलदरा येथे मुक्कामाची व जेवणाची उत्तम सोय होवू शकते. चिखलदरा ते गाविलगड हे दोन किलोमिटरचे अंतर असून गाविलगडापर्यंत वाहनाने आपण जावू शकतो. चिखलदर्याच्या कडून निघालेल्या एका दांडावरील पठारावर गाविलगडाचा किल्ला बांधलेला आहे.
ऑक्टोबर ते जून मध्ये इथे हवामान खूपच छान असते.