आमच्या कार्यासंबंधी

गडकोट म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या व आपल्या बापजाद्यानी गाजविलेल्या अतुलनीय पराक्रमाचा वारसा सांगणारी शिल्पे. हे गडकोट आपल्या महाराष्ट्राचा आत्मा आहेत. ह्या गडकोटांसाठी महाराजांनी व मावळ्यांनी वेळप्रसंगी रक्त सांडवून हे गडकोट राखले आहेत. महाराज हे गडकोट अगदी प्राणांच्या पलीकडे जपत होते. “सह्याद्री प्रतिष्ठान” हि संस्था महाराजांच्या ह्याच विचारावर गडकोटांच्या संवर्धन कार्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. आज संस्थेच्या माध्यमातून हे दुर्गसंवर्धन कार्य अविरत अन अहोरात्र सुरु आहे. यासाठी संस्थेचा प्रत्येक दुर्गसेवक वचनबद्ध आहे.

!! सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र !!

सह्याद्री प्रतिष्ठान हि संस्था छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेल्या गडकोटांच्या संवर्धन कार्याचा वारसा पुढे घेऊन मार्गक्रमण करणारी संस्था आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात संस्थेच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याची अतुलनीय गाथा सांगणाऱ्या गडकोटांचे संवर्धन कार्य अविरत सुरु आहे. हे कार्य यापुढेही असेच अविरत सुरु असेल. आपला अतुलनीय अनमोल ऐतिहासिक वारसा असाच आपल्या पुढच्या पिढ्यांना दाखवता यावा यासाठी असलेला हा अट्टाहास. अन हा वारसा टिकवून ठेवण्यासाठी आपलाही हातभार असावा म्हणूण संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक दुर्गसेवक या कार्यासाठी सदैव कटिबद्ध आहे.

छत्रपती शिवराय त्यांच्या विचारातून आणि कार्यातून आजही जिवंत आहेत, पण आज एकाच गोष्टीचे वाईट वाटते कि इथल्या प्रत्येक माणसाची मने मेलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे प्रत्येक मरगळलेल्या माणसाला नेहमीच प्रेरणा देत आहे आणि यापुढेही राहील. त्याच विचारांवर त्यांची प्रेरणा घेऊन सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र वर्षभर छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य घरोघर पोहचविण्याचे काम करत आहे. यामध्ये आपणही सहभागी व्हा.

!! सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु असलेले कार्य !!

bankot fort

)स्वराज्याचा तोफगडा – किल्ले मंडणगड व किल्ले बाणकोट – 

स्वराज्याचा तोफगाडा या उपक्रमाच्या माध्यमातून अनुक्रमे बारावा व तेरावा मान मिळावा तो किल्ले  मंडणगड व किल्ले बाणकोट या किल्ल्यावंरील तोफांना. गडावर असेच धूळ खात पडलेल्या तोफांना त्यांचे मानाचे स्थान परत मिळावे  म्हणून  केलेलं  हा अट्टाहास. दिनांक  ६ डिसेंबर   २०२० रोजी हा दुर्गार्पण सोहळा सह्याद्रीच्या दुर्गसेवकांच्या उपस्थित पार पडला.

ausa fort

२)स्वराज्याचा तोफागडा –किल्ले औसा लातूर

“स्वराज्याचा तोफगाडा” या उपक्रमाच्या माध्यमातून  सहावा मान मिळाला तो लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील औसा किल्ल्यावर असणाऱ्या तोफांना. प्रतिष्ठान च्या माध्यमातून लोकसहभागातून निधी उभारून सागवानी तोफागाडे बसविण्यात आले. त्याचा दुर्गार्पण सोहळा १२ मे २०१९ रोजी आयोजित करण्यात आला होता.  

३)स्वराज्याचा तोफागाडा – किल्ले चावंड –
“स्वराज्याचा तोफागाडा” या उपक्रमाच्या माध्यमातून अकरावा मान मिळाला तो इसवीसन पूर्व काळापासून ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या अन छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील एकमेव तोफ असलेल्या किल्ले चावंड असलेल्या तोफेला. किल्ले चावंड याठिकाणी कातळात अनेक वर्ष गाडून उभी होती. कधी काळी त्याच तोफेला दोर बांधून गावकरी गडावर जात असत. हा ऐतिहासिक वारसा असाच गाडून ऊन वारा व पावसाचा मारा घेत मोकळा श्वास घेण्याची वाट पाहत होता.
हि तोफ बाहेर काढून तिला पुन्हा मानाचे स्थान मिळावे म्हणून सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी स्वतः निधी उभारून त्या तोफेस तोफागाडा बसवत तिला तिचा सन्मान मिळवून दिला. हा सन्मान सोहळा दिनांक १९ जानेवारी २०२० रोजी फत्तेशिकस्त व फर्जंद चित्रपटांचे दिग्दर्शक श्री. दिगपाल लांजेकर, महाराष्ट्राची लोकधारा चे शाहीर श्री. बाळासाहेब काळजे पाटील, चावंड गावचे सरपंच श्री. रामा भालचीम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला.

fort
fort

४ )स्वराज्याचा प्रवेशद्वार – किल्ले हडसर –
स्वराज्याचे प्रवेशद्वार या उपक्रमाच्या माध्यमातून तेरावा मान मिळाला तो किल्ले हडसर च्या महादरवाजाच्या प्रवेशद्वाराला. शिवजन्मभूमीच्या दुर्गवैभवातील मानाचं पण म्हणजे किल्ले हडसर, स्थापत्यशास्त्रातील बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेला हा किल्ले हडसर दुर्गभटक्या मंडळींचा अतिशय लाडका गड. यागडाच्या प्रवेशद्वाराजवळ गेली कित्येक वर्ष दगडांचा खच पडून होता. संस्थेच्या शिवजन्मभूमी विभागातील सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी मोठ्या कष्टाने हे दगड फोडून ह्या प्रवेशद्वाराला मोकळा श्वास दिला आहे. ह्या दरवाजासाठी लागणारा सर्व आर्थिक निधी हा लोकसहभागातून उभारण्यात आला आहे. दिनांक २० जानेवारी २०२१ रोजी ह्या प्रवेशद्वाराचा दुर्गार्पण सोहळा आयोजित करण्यात आला.

५ ) स्वराज्याचे प्रवेशद्वार – किल्ले हरिहर –

“स्वराज्याचे प्रवेशद्वार” या उपक्रमाच्या माध्यामतून अकरावा दरवाजा बसविण्याचा मान मिळाला नाशिक जिल्ह्यातील अतिशय नावाजलेला अन भटक्या मंडळींच्या आवडीचा किल्ला म्हणजे हरिहरला. किल्ल्यावर चढायचं म्हणजे वाऱ्याशी स्पर्धा करण्यासारखंच. चढाई अतिशय अवघड असलेल्या ह्या गडावरील प्रवेशद्वारास दरवाजा दिनांक १२ जानेवारी २०२० रोजी संस्थेच्या नाशिक विभागाच्या वतीने लोकसहभागातून निधी उभारून बसविण्यात आला.

fort

६) स्वराज्याचे प्रवेशद्वार – किल्ले कर्नाळा -

“स्वराज्याचे प्रवेशद्वार” या उपक्रमाच्या माध्यामतून चौथा दरवाजा बसविण्याचा मान मिळाला तो अगदी आभाळाला भिडणाऱ्या किल्ले कर्नाळाला. मुंबई गोवा हायवे पासून हाकेच्या अंतरावर उभा असलेला अन शिवकाळातील अनेक घडामोडींची साक्ष देणारा हा किल्ले कर्नाळा. ह्या किल्ल्यावरील प्रवेशद्वारास लाकडी सागवानी कवाड लोकसहभागातून निधी उभारून बसविण्यात आले. दिनांक २५ नोव्हेंबर २०१८ रोजी हा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला.              

७ ) स्वराज्याचा तोफगाडा – किल्ले कोथळीगड –

fort
fort

“स्वराज्याचा तोफगाडा” या उपक्रमाच्या माध्यामतून तिसरा मान मिळाला तो कोथळीगडावरील तोफेला. कर्जत तालुक्यातील असणारा हा दुर्ग, येथे एक तोफ अनेक वर्षापासून अशीच धूळ खात पडून होती. तिचे संवर्धन व्हावे, तसेच ती दिर्घकाळ टिकावी यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने लोकसहभागातून निधी उभा करून दिनांक १७ फेब्रुवारी २०१९ रोजी तोफगाडा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

८ )स्वराज्याचे प्रवेशद्वार – किल्ले कोथळीगड

“स्वराज्याचा तोफगाडा” या उपक्रमाच्या माध्यामतून तिसरा मान मिळाला तो कोथळीगडावरील तोफेला. कर्जत तालुक्यातील असणारा हा दुर्ग, येथे एक तोफ अनेक वर्षापासून अशीच धूळ खात पडून होती. तिचे संवर्धन व्हावे, तसेच ती दिर्घकाळ टिकावी यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने लोकसहभागातून निधी उभा करून दिनांक १७ फेब्रुवारी २०१९ रोजी तोफगाडा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

fort

९ )स्वराज्याचा तोफगाडा – किल्ले कोर्लई

“स्वराज्याचा तोफागडा” उपक्रमाच्या माध्यामतून पाचवा मान मिळाला तो रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टीवरील अन स्वराज्याच्या आरमारातील एक अतिशय महत्वाचा असलेल्या किल्ल्यावरील तोफांना. ह्या किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक तोफा अशाच धूळखात पडून आहेत. त्यापैकी ६ तोफांना प्रतिष्ठानच्या वतीने सागवानी लाकडाचे तोफगाडे बसविण्यात आले. सदर तोफगाड्यासाठी लोकसहभागातून निधी उभारण्यात आला. महाराष्ट्र दिन दुर्गदिन दिनांक १ मे २०१९ रोजी चे औचित्य साधत हा दुर्गार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

१० )स्वराज्याचा तोफगाडा – किल्ले कुलाबा

“स्वराज्याचा तोफगाडा” या उपक्रमाच्या माध्यामतून दुसरा मान मिळाला तो सिंधूसागरातील आरमाराची राजधानी असलेल्या किल्ले कुलाबा येथील तोफांना. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देणारी हि पवित्र भूमी म्हणजेच किल्ले कुलाबा. या किल्यावर अशाच धूळ खात पडलेल्या तोफांचे संवर्धन व्हावे तसेच त्या दिर्घकाळ टिकाव्यात म्हणून प्रतिष्ठान च्या माध्यामतून अन लोकसहभागातून निधी उभारून सागवानी तोफगाडे बसविण्यात आले. या किल्ल्यावरील एकूण ३ तोफांना तोफगाडे बसविण्यात आले. दिनांक २० जानेवारी २०१९ रोजी हा लोकार्पण सोहळा करण्यात आला.

 

fort

११ )स्वराज्याचा तोफगाडा – किल्ले पद्मदुर्ग

“स्वराज्याचा तोफगाडा” या उपक्रमाच्या माध्यामतून सातवा मान मिळाला तो जंजिऱ्यावरील मुजोर सिद्दीला कायमचा आळा बसावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिती केलेल्या पद्मदुर्ग किल्ल्यावरील तोफांना.  पद्मदुर्ग किल्ल्यावर असणार्या तोफा अशाच बेवारस पडून होत्या. प्रतिष्ठानच्या लक्षात हि बाब आल्यावर त्या तोफांना हि तोफगाडे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी लागणारा निधी हा लोकसहभागातून उभारण्यात आला. हा दुर्गार्पण सोहळा दिनांक २६ मे २०१९ रोजी आयोजित करण्यात आला.

 

१२) स्वराज्याचा तोफगाडा – किल्ले उंदेरी

“स्वराज्याचा तोफगाडा” या उपक्रमाच्या माध्यामतून तिसरा मान मिळाला तो कोथळीगडावरील तोफेला. कर्जत तालुक्यातील असणारा हा दुर्ग, येथे एक तोफ अनेक वर्षापासून अशीच धूळ खात पडून होती. तिचे संवर्धन व्हावे, तसेच ती दिर्घकाळ टिकावी यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने लोकसहभागातून निधी उभा करून दिनांक १७ फेब्रुवारी २०१९ रोजी तोफगाडा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

port

१३) स्वराज्याचा तोफगाडा – किल्ले वेताळवाडी

“स्वराज्याचा तोफगाडा” या उपक्रमाच्या माध्यामतून चौथा मान मिळाला तो संभाजीनगर जिल्ह्यातील वेताळवाडी किल्ल्यावरील असलेल्या अतिशय वजन असलेल्या तोफेला. वेताळवाडी ह्या किल्ल्यावर भव्य अशी दोन टन वजनाची तोफ या ठिकाणी अशीच जमिनीवर पडून होती. तिची दुरावस्था प्रतिष्ठान च्या लक्षात येताच त्या तोफेसाठी देशातील पहिलाच युरोपीय पद्धतीचा तोफगाडा बनवून बसविण्याचे ठरले. यासाठी लागणारा सर्व निधी लोकसहभागातून उभा करण्यात आला. या तोफगाड्याचा दुर्गार्पण सोहळा हा दिनांक २८ एप्रिल २०१९ रोजी करण्यात आला.

१४ )स्वराज्याचे प्रवेशद्वार – किल्ले तिकोणा

“स्वराज्याचे प्रवेशद्वार” या उपक्रमाच्या माध्यामतून दुसरा दरवाजा बसविण्याचा मान मिळाला तो पवन मावळचा दुसरा मानबिंदू म्हणून असलेल्या किल्ले तिकोणा उर्फ वितंडगडाला. शिवकाळातील अनेक ऐतहासिक घडामोडींची साक्ष देणारा हा किल्ले तिकोणा. किल्ला अगदी रुबाबात उभं राहिलेल्या पहारेकऱ्यासारखा. कणखर असलेल्या या किल्ल्याच्या बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या मुख्य प्रवेशद्वाराला दिनांक ८ जून २०१८ रोजी लोकसहभागातून निधी उभारून लाकडी सागवानी कवाड बसविण्यात येऊन त्याचा लोकार्पण सोहळा अनेक मान्यवर व सह्याद्रीचे दुर्गसेवक यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

१५ )स्वराज्याचे प्रवेशद्वार – किल्ले तोरणा

“स्वराज्याचे प्रवेशद्वार” या उपक्रमाच्या माध्यामतून पाचवा दरवाजा बसविण्याचा मान मिळाला स्वराज्याचे तोरण म्हणून ज्या किल्ल्यावर पहिल्यांदा भगवा ध्वज उभारला गेला. जो किल्ला महाराजांनी पहिल्यांदा जिंकला आणि हिंदवी स्वराज्याची घोडदौड सुरु झाली. असा हा सगळ्यांचा लाडका किल्ला म्हणजेच तोरणा उर्फ प्रचंडगड या गडावरील महादरवाजाला. स्वराज्याचं तोरण म्हणून प्रख्यात असलेल्या या किल्ल्याला प्रतिष्ठान च्या वतीने लोकसहभागातून निधी उभारून गडाच्या बिन्नी दरवाजाला सागवानी लाकडी प्रवेशद्वार बसविण्यात आले आहे. दिनांक ३१ मार्च २०१९ रोजी हा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

१६) स्वराज्याचा तोफगाडा – किल्ले संग्रामदुर्ग

“स्वराज्याचा तोफगाडा” या उपक्रमाच्या माध्यामतून आठवा मान मिळाला तो शाहिस्तेखान सारख्या मस्तवाल शत्रूला त्याची औकात दाखवून देणाऱ्या संग्रामदुर्ग किल्ल्यावरील तोफांना. चाकण शहराच्या मधोमध असलेला पुणे जिल्ह्यातील एक भुईकोट किल्ला. शाहिस्तेखानला दोन महिने झुंजायला लावणारा हा दुर्ग. ह्या किल्ल्यावरअसणाऱ्या दोन तोफा ह्या सिमेंटच्या चौथऱ्यावर ठेवण्यात आल्या होत्या. त्यासाठी प्रतिष्ठान कडून दोन तोफगाडे अर्पण करण्यात आले. ह्यासाठी लागणारा सर्व निधी हा लोकसहभागातून उभारण्यात आला. हा दुर्गार्पण सोहळा दिनांक २ जून २०१९ रोजी आयोजित करण्यात आला.

१७) स्वराज्याचे प्रवेशद्वार – किल्ले सरसगड

“स्वराज्याचे प्रवेशद्वार” या उपक्रमाच्या माध्यामतून अनुक्रमे सातवा व आठवा दरवाजा बसविण्याचा मान मिळाला रायगड जिल्ह्यातील अष्टविनायक गणपतीचे असलेले पाली अन त्याच परिसरात असलेल्या सरसगडला. ह्या किल्ल्याच्या दोन्ही प्रवेशद्वाराना सागवानी दरवाजे बसविण्यात आले. आतापर्यंत च्या स्वराज्याचे प्रवेशद्वार या संकल्पनेत पहिल्यांदाच एकाच वेळी दोन दरवाजे बसवून त्याचा दुर्गार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. दसरा सणाचे औचित्य साधत दिनांक ८ ऑक्टोबर २०१९ रोजी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. ह्या वेळी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत सिद्दी ची भूमिका करणारे श्री. विश्वजित फडते, ज्यांच्या दातृत्वातून हे दरवाजे उभे राहिले ते उद्योजक श्री. किशोर धारिया, तसेच वनविभागाचे अधिकारी श्री. सुनील लिमये साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

१८) स्वराज्याचे प्रवेशद्वार – किल्ले सिंहगड

“स्वराज्याचे प्रवेशद्वार” या उपक्रमाच्या माध्यामतून नववा दरवाजा बसविण्याचा मान मिळाला तो राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांचा आवडता असलेला, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या रक्ताने विजयगाथा लिहिलेला, सरदार नावजी बलकवडे यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा, छत्रपती राजाराम महाराज यांची समाधीभूमी, पुणे जिल्ह्यातील पुणेकरांचा सगळ्यात आवडत्या असलेल्या सिंहगड. प्रतिष्ठान च्या माध्यमातून लोकसहभागातून निधी उभारून गडाच्या पुणे दरवाजास सागवानी दरवाजा बसविण्यात आला. हा दुर्गार्पण सोहळा दिनांक १३ ऑक्टोबर २०१९ रोजी आयोजित करण्यात आला होता. ह्या सोहळ्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील पुतळा बाईसाहेब यांची भूमिका केलेल्या पल्लवी वैद्य, कोंडाजी बाबा फर्जंद यांची भूमिका केलेले आनंद काळे, बहिर्जी नाईक यांची भूमिका केलेले अजय तापकिरे, सरदार पिलाजीराव जाधवराव यांचे वंशज समीर जाधवराव हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. तसेच किल्ले सिंहगड च्या परिसरातील सर्व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

१९) स्वराज्याचे प्रवेशद्वार – किल्ले सज्जनगड

“स्वराज्याचे प्रवेशद्वार” या उपक्रमाच्या माध्यामतून सहावा दरवाजा बसविण्याचा मान मिळाला संत श्री. रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेली हि भूमी असलेल्या किल्ले सज्जनगडला. ह्या गडावरील महादरवाजास लाकडी प्रवेशद्वार बसविण्यात यावे. हि संकल्पना मांडण्यात आली. त्यासाठी लागणारा सर्व निधी हा लोकसहभागातून उभारण्यात आला. तसेच येथील प्रवेशद्वारावर छत्रपतींच्या एकेरी नावाचा उल्लेख होता तोही बदलून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे नामकरण करण्यात आले. या दुर्गार्पण सोहळ्यासाठी छत्रपती उदयनमहाराज भोसले स्वतः उपस्थित होत. विशेष म्हणजे ह्या सोहळ्यास स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी मालिकेतील अनाजी पंत यांची भूमिका केलेले श्री. महेश कोकाटे, हिरोजी फर्जंद यांची भूमिका केलेले श्री. रमेश रोकडे, तसेच बाल रामराजे यांची भूमिका केलेले ओम चंदने हे देखील उपस्थित होते. हा दुर्गार्पण सोहळा दिनांक १५ सप्टेंबर २०१९ रोजी साजरा करण्यात आला.

२०) दुर्गसंवर्धन मोहीम – छत्रपती शिवाजी महाराज व आपले बापजादे यांनी वेळप्रसंगी आपले प्राण जोखमीत घालून हे गडकोट राखलेत. ह्याच पवित्र गडकोटांच्या साथीने महाराजांनी अठरापगड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन हे हिंदवी स्वराज्य उभारलं. त्याच हिंदवी स्वराज्याच्या अतुलनीय पराक्रमाचा वारसा सांगणारे गडकोट आपल्या पुढच्या पिढ्यांना अभ्यासण्यासाठी जिवंत ठेवायचे असतील तर मग मात्र त्यांचे संवर्धन हे आपल्यालाच करावे लागणार आहे. ह्याच पवित्र गडकोटांची पराक्रमी माती सदैव आपल्याला त्या अतुलनीय पराक्रमाची प्रेरणा देणार आहे. म्हणूनच ह्या सर्व गडकोटांचे संवर्धन करणे हे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.  ह्या दुर्गसंवर्धन कार्यासाठी  आम्ही सह्याद्रीचे दुर्गसेवक गेली १२ वर्ष हे कार्य अगदी अविरतपणे व अव्याहतपणे हे दुर्गसंवर्धन कार्य करत आहोत. इतकंच नव्हे तर आम्ही सह्याद्रीचे दुर्गसेवक हे करत असलेलं दुर्गसंवर्धन कार्य आमच्या जिल्ह्यातील तालुक्यातील प्रत्येक गावात पोहचविण्यासाठी सज्ज आहोत. आजवर संस्थेच्या माध्यमातून ९०० हून अधिक दुर्गसंवर्धन मोहीम महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर राबविण्यात आलेल्या आहे. ह्या दुर्गसंवर्धन कार्यात गडावरील पाण्याच्या टाक्यांमधील गाळ, माती काढणे, गडावरील प्रवेशद्वार यांमधील असलेले दगड, माती बाजूला करणे, तटबंदीवर असणारी अनावश्यक झुडपे काढून टाकणे. संस्थेच्या माध्यमातून हे सर्व कार्य भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, राज्य पुरातत्व विभाग, वनविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत.

२१)दुर्गदर्शन मोहीम – संस्थेच्या माध्यमातून आजवर १७०० हून अधिक दुर्गदर्शन मोहिमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मोहिमेचा प्रमुख उद्देश म्हणजे देशातील वेगवेगळ्या राज्यातील गडकोट यांचा अभ्यास करणे, या गडकोटांची बांधणी पद्धत, संरक्षणदृष्ट्या असलेलं महत्व, या गडकोटांची दुर्गमता हि सर्व वैशिष्ट्ये यांचाही अभ्यास करण्यात येत आहे. तसेच सर्व गडकोटांची छायाचित्र घेऊन भविष्यात त्या छायाचित्रांच्या माध्यमातून संस्थेच्या इतर सदस्यांना त्याचा अभ्यास करता यावा हाही एक मुख्य उद्देश आहे. सदर सर्व अभ्यास मोहीम ह्या संस्थेचे संस्थापक श्री. श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. आजवर राबविण्यात आलेल्या या दुर्गदर्शन मोहिमेत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहार, दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ या राज्यात असणाऱ्या गडकोटांचा अभ्यासपूर्ण दौरा यशस्वीपणे पूर्ण करण्यात आलेला आहे.

२२)शिवरथ यात्रा – काय आहे शिवरथ यात्रा ??? तर शिवरथ यात्रा म्हणजे देशातील मानाचा पहिला पालखी सोहळा.

अखंड महाराष्ट्राला अनेक वर्षाच्या गुलागिरीच्या जोखडातून मुक्त करून येथील शेतकऱ्यालाचा आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी शेताच्या बांधावर हातात शस्त्र देऊन खऱ्या अर्थाने रयतेचं राज्य म्हणजेच हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पालखी सोहळा. आज आपल्या देशात आषाढ महिन्यात आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर, त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर, सासवड ते पंढरपूर, मुक्ताईनगर जळगाव ते पंढरपूर, पैठण ते पंढरपूर, शेगाव ते पंढरपूर, नांदेड ते पंढरपूर अशा अनेक संतांच्या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून वारी सोहळ्याचे आयोजन केले जाते. ह्या वारी सोहळ्याच्या माध्यमातून लाखो भाविक अखंड नामाचा गजर करत पंढरपूर ला अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठोबा रखुमाई च्या दर्शनासाठी जात असतात. तसेच कार्तिक महिन्यात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे समाधीस्थळ आळंदी याठिकाणी महाराष्ट्रातून अनेक गावातून भाविक वारी सोहळ्याचे आयोजन करत असतात, तसेच देहू येथे जगदगुरू श्री. तुकाराम महाराज यांच्याही दर्शनासाठी वारी सोहळ्याचे आयोजन होत असते. हाच उद्देश मनात ठेऊन मोगली सत्तांच्या गुलागिरीच्या जोखडातून रयतेची मुक्तता करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हि पालखी सोहळा असावा या उद्देशातून ह्या शिवरथ यात्रा पालखी सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या माध्यमातून सन २०११ पासून सुरु करण्यात आला. तसेच ह्या पालखी सोहळ्याचा महत्वाचा उद्देश म्हणजे संस्थेच्या माध्यामतून सुरु असलेले दुर्गसंवर्धन कार्य व त्या माध्यमातून सुरु केलेली  दुर्गसंवर्धन चळवळ हि गावोगावी पोहचावी व त्या चळवळीत लोकसहभाग वाढावा. ह्या दुर्गसंवर्धन कार्यासाठी समाजातील तरुणाई सहभागी व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा पालखी सोहळा शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी ते दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड असा आयोजित केला जातो. या पालखी सोहळ्यादरम्यान अनेक शिवप्रभूंच्या इतिहासाची व्याख्याने, शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके, शाहिरी पोवाडे, संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या दुर्गसंवर्धन कार्याची माहिती या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.  ह्या पालखी सोहळ्याचे आयोजन दरवर्षी दिनांक ३ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान करण्यात येते. राज्यातील संस्थेच्या माध्यमातून काम करणारे सह्याद्रीचे दुर्गसेवक ह्या पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात.