मोहनगड / दुर्गाडी किल्ला / जननी दुर्ग

मोहनगड / दुर्गाडी किल्ला / जननी दुर्ग

रंध घाट चढून गेल्यावर पुढे अशीम्बी / धारमंडप आणि मग शिरगाव नावाचे एक गाव लागते. तेथून पुढे घाट उतरत गेल्यावर दुर्गाडी गावाचा फाटा येतो. ह्या घाटातून दुर्गाडी किल्ल्याचे मोहक रूप दिसते. दुर्गाडी असे पायथ्याचे गाव असल्या कारणाने तो किल्ला दुर्गाडी म्हणूनच ओळखला जातो. वर जननी मातेचे देऊळ आहे. त्यामुळे गावकरी जननीला जायचे आहे का असे विचारतात. काही लोक यास जननी दुर्ग असे देखील संबोधतात. शिरगाव गावातून देखील एक वाट आहे परंतु तेथे उभा चढ आहे. दुर्गाडी गावातून किल्ल्याला जायची वाट सोपी आणि कमी चढाची आहे. शिरगाव गावातून किल्ल्याच्या दिशेने पाहता, डावीकडे जी खिंड दिसते त्याच्या पलीकडे दुर्गाडी गाव आहे. दुर्गाडी तून त्या खिंडीपर्यंत एकदम सोप्पा रस्ता आहे. त्या पुढे धरे वरून चढायच आणि मग कड्याला डावीकडे ठेऊन हिरव्यागार जंगलातून वळसा मारायचा. शिरगाव हून येणारी वाट जेथे मिळते तेथे एक छोटेसे देऊळ आहे. त्यानंतर सरळ पायवाटेने पुढे जाऊन वर चढाई केली असता काही ठिकाणी पावट्या आणि कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात.

मंदिराच्या अलीकडे डावीकडे एक वाट खाली उतरते. त्याने पुढे गेल्यावर कातळात खोदलेली पाण्याची ३ टाकी आहेत. त्यातील २ मातीने बुजली आहेत. तर एका खांब टाक्यात चांगले पिण्या योग्य पाणी आहे. जननी मातेच्या मंदिरा पाशी एक नंदी आहे. मंदिरा मागील पाउल वाटेने वर चढल्यावर आपण किल्ल्याच्या टोकावर पोहोचतो.

तेथून सगळा परिसर न्याहाळायचा. अगदी मोक्याच्या ठिकाणी वसलेला असा हा किल्ला चहू दिशेला लक्ष ठेवण्यासाठी एकदम सोयीस्कर. हिरडस मावळ, वरंध घाट, चिकना घाट (दुर्गाडी हून खाली कोंकणात गोठवली ला उतरण्याची वाट)यावर लक्ष ठेवण्य करिता ह्या किल्ल्याचा उपयोग झाला असावा. रायगड, राजगड, तोरणा, पुरंधर, कावळ्या, कांगोरी/मंगळगड, रोहिडा, रायरेश्वराचे पठार, नाखींडा, प्रतापगड असा बराच मुलुख दृष्टीस पडतो. वर बांधकामाचे काहीच अवशेष नाहीत. त्यामुळे गडावर कधीकाळी शिबंदी असल्याची काहीच खूण नाही. वर सपाट जागा देखील फार थोडीच. असा हा दुर्गाडी २००९ साली ‘मोहनगड’ या नावाने सगळ्या दुर्ग प्रेमींना परिचित झाला.

शिवाजी राजांनी प्रतापगडाच्या युद्धाच्या आधी, बाजी प्रभू देशपांडे यांना लिहिलेल्या पत्रात सांगितले आहे, “फार दिवसांपासून ओस पडलेला जासलोडगड किल्ला डागडुजी करून व्यवस्थित करावा, ५ – २५ शिबंदी वसवावी, मोहनगड असे नाव द्यावे आणि गड राबता ठेवावा.” ह्या पत्राचा दाखला घेऊन दुर्गाडी हाच मोहनगड असावा असा काहींचा कयास आहे. इतिहासात डोकावून पाहिले असता प्रतापगडाच्या युद्धानंतर राजांनी पार कोल्हापुरात मुसंडी मारली आणि पन्हाळगड ताब्यात घेतला. बाजीप्रभू त्यावेळेस राजांसमावेत होते. त्या नंतर वर्षभरातच पन्हाळ्याला सिद्धी चा वेढा पडला. ४ महिने राजे व बाजीप्रभू पन्हाळ्यावर वेढ्यात अडकले होते. पन्हाळ्याहून निसटताना बाजींचे निधन झाले. त्यामुळे पत्रात उल्लेख केल्या प्रमाणे बाजींनी दुर्गाडी / मोहनगड / जासलोडगड कितपत वसवला असेल या बद्दल शंकाच येते. एकूण केवळ घाट वाटांवर लक्ष ठेवण्याकारीताच दुर्गाडी चा वापर झाला असेल. तोच मोहनगड वा जासलोडगड आहे का याबद्दल अजूनही शंकाच येते.