!! सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु असलेले कार्य !!

दुर्गसंवर्धन मोहीम

छत्रपती शिवाजी महाराज व आपले बापजादे यांनी वेळप्रसंगी आपले प्राण जोखमीत घालून हे गडकोट राखलेत. ह्याच पवित्र गडकोटांच्या साथीने महाराजांनी अठरापगड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन हे हिंदवी स्वराज्य उभारलं. त्याच हिंदवी स्वराज्याच्या अतुलनीय पराक्रमाचा वारसा सांगणारे गडकोट आपल्या पुढच्या पिढ्यांना अभ्यासण्यासाठी जिवंत ठेवायचे असतील तर मग मात्र त्यांचे संवर्धन हे आपल्यालाच करावे लागणार आहे. ह्याच पवित्र गडकोटांची पराक्रमी माती सदैव आपल्याला त्या अतुलनीय पराक्रमाची प्रेरणा देणार आहे. म्हणूनच ह्या सर्व गडकोटांचे संवर्धन करणे हे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. ह्या दुर्गसंवर्धन कार्यासाठी आम्ही सह्याद्रीचे दुर्गसेवक गेली १२ वर्ष हे कार्य अगदी अविरतपणे व अव्याहतपणे हे दुर्गसंवर्धन कार्य करत आहोत. इतकंच नव्हे तर आम्ही सह्याद्रीचे दुर्गसेवक हे करत असलेलं दुर्गसंवर्धन कार्य आमच्या जिल्ह्यातील तालुक्यातील प्रत्येक गावात पोहचविण्यासाठी सज्ज आहोत. आजवर संस्थेच्या माध्यमातून ९०० हून अधिक दुर्गसंवर्धन मोहीम महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर राबविण्यात आलेल्या आहे. ह्या दुर्गसंवर्धन कार्यात गडावरील पाण्याच्या टाक्यांमधील गाळ, माती काढणे, गडावरील प्रवेशद्वार यांमधील असलेले दगड, माती बाजूला करणे, तटबंदीवर असणारी अनावश्यक झुडपे काढून टाकणे. संस्थेच्या माध्यमातून हे सर्व कार्य भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, राज्य पुरातत्व विभाग, वनविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत.
संस्थेच्या माध्यमातून आजवर १७०० हून अधिक दुर्गदर्शन मोहिमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मोहिमेचा प्रमुख उद्देश म्हणजे देशातील वेगवेगळ्या राज्यातील गडकोट यांचा अभ्यास करणे, या गडकोटांची बांधणी पद्धत, संरक्षणदृष्ट्या असलेलं महत्व, या गडकोटांची दुर्गमता हि सर्व वैशिष्ट्ये यांचाही अभ्यास करण्यात येत आहे. तसेच सर्व गडकोटांची छायाचित्र घेऊन भविष्यात त्या छायाचित्रांच्या माध्यमातून संस्थेच्या इतर सदस्यांना त्याचा अभ्यास करता यावा हाही एक मुख्य उद्देश आहे. सदर सर्व अभ्यास मोहीम ह्या संस्थेचे संस्थापक श्री. श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. आजवर राबविण्यात आलेल्या या दुर्गदर्शन मोहिमेत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहार, दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ या राज्यात असणाऱ्या गडकोटांचा अभ्यासपूर्ण दौरा यशस्वीपणे पूर्ण करण्यात आलेला आहे.

दुर्गदर्शन मोहीम

शिवरथ यात्रा

काय आहे शिवरथ यात्रा ??? तर शिवरथ यात्रा म्हणजे देशातील मानाचा पहिला पालखी सोहळा. अखंड महाराष्ट्राला अनेक वर्षाच्या गुलागिरीच्या जोखडातून मुक्त करून येथील शेतकऱ्यालाचा आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी शेताच्या बांधावर हातात शस्त्र देऊन खऱ्या अर्थाने रयतेचं राज्य म्हणजेच हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पालखी सोहळा. आज आपल्या देशात आषाढ महिन्यात आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर, त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर, सासवड ते पंढरपूर, मुक्ताईनगर जळगाव ते पंढरपूर, पैठण ते पंढरपूर, शेगाव ते पंढरपूर, नांदेड ते पंढरपूर अशा अनेक संतांच्या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून वारी सोहळ्याचे आयोजन केले जाते. ह्या वारी सोहळ्याच्या माध्यमातून लाखो भाविक अखंड नामाचा गजर करत पंढरपूर ला अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठोबा रखुमाई च्या दर्शनासाठी जात असतात. तसेच कार्तिक महिन्यात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे समाधीस्थळ आळंदी याठिकाणी महाराष्ट्रातून अनेक गावातून भाविक वारी सोहळ्याचे आयोजन करत असतात, तसेच देहू येथे जगदगुरू श्री. तुकाराम महाराज यांच्याही दर्शनासाठी वारी सोहळ्याचे आयोजन होत असते. हाच उद्देश मनात ठेऊन मोगली सत्तांच्या गुलागिरीच्या जोखडातून रयतेची मुक्तता करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हि पालखी सोहळा असावा या उद्देशातून ह्या शिवरथ यात्रा पालखी सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या माध्यमातून सन २०११ पासून सुरु करण्यात आला. तसेच ह्या पालखी सोहळ्याचा महत्वाचा उद्देश म्हणजे संस्थेच्या माध्यामतून सुरु असलेले दुर्गसंवर्धन कार्य व त्या माध्यमातून सुरु केलेली दुर्गसंवर्धन चळवळ हि गावोगावी पोहचावी व त्या चळवळीत लोकसहभाग वाढावा. ह्या दुर्गसंवर्धन कार्यासाठी समाजातील तरुणाई सहभागी व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा पालखी सोहळा शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी ते दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड असा आयोजित केला जातो. या पालखी सोहळ्यादरम्यान अनेक शिवप्रभूंच्या इतिहासाची व्याख्याने, शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके, शाहिरी पोवाडे, संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या दुर्गसंवर्धन कार्याची माहिती या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. ह्या पालखी सोहळ्याचे आयोजन दरवर्षी दिनांक ३ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान करण्यात येते. राज्यातील संस्थेच्या माध्यमातून काम करणारे सह्याद्रीचे दुर्गसेवक ह्या पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात.
“संकल्प स्वराज्यसिद्दीचा” या संकल्पनेच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेल्या स्वराज्याची शपथ दिनाचे औचित्य साधून दिनांक ३० मार्च २०१६ रोजी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. ज्या गडकोटांच्या साथीने महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ ज्या रायरेश्वराच्या साक्षीने घेतली त्याच रायरेश्वर किल्ल्याला साक्ष ठेवून या मोहिमेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील ३०० किल्ल्यांवर भगवा ध्वज व सफाई मोहीम प्रतिष्ठान च्या माध्यामतून राबविण्यात आली होती. या मोहिमेत मोहीम घेतलेल्या प्रत्येक गडावर स्वच्छता मोहीम राबवून त्याठिकाणी असणारा सर्व कचरा जमा करून तो सर्व कचरा योग्य ठिकाणी नष्ट करण्यात आला. तसेच सायंकाळी ठीक ४ वाजता मोहीम घेतलेल्या प्रत्येक गडावर भगवा ध्वज फडकविण्यात आला. या मोहिमेत एकूण १३५० सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे या मोहिमेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड या राष्ट्रीय रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे.

मिशन ३००

एक हात मदतीचा

ज्या मातीतून आपण जन्माला येतो, ज्या समाजात आपण राहतो, त्या मातीशी अन समाजाशी आपली सामाजिक बांधिलकी असते. त्या समाजाचे, मातीचे आपल्यावर ऋण असतात. प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्गसंवर्धन चळवळीचे कार्य करत असताना सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत समाजातील अतिशय दुर्लक्षित व गरजू कुटुंबाना, तसेच गडकोटांच्या पायथ्याशी असलेल्या अतिशय दुर्गम भागातील विद्यार्थी, नागरिक यांना संस्थेच्या माध्यमातून आजवर हजारो कुटुंबांना शालेय साहित्य, गणवेश, जिवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे, दिवाळी सणासाठी लागणारे साहित्य वाटप करण्यात आले आहे. तसेच सन २०१९ च्या पावसाळ्यात कोल्हापूर सातारा सांगली याठिकाणी आलेल्या महापुरात अडकलेल्या बांधवांसाठी संस्थेच्या माध्यमातून मदतकार्य करण्यात आले. तसेच रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या वस्तू, धान्य, कपडे इत्यादी वस्तूंचे वाटपही करण्यात आले.
आपण ज्या देशात राष्ट्रात राहतो, त्या राष्ट्राच्या देशाच्या सीमा ह्या संरक्षित नसतील तर आपण आपलं जीवन सुखाने जगू शकत नाही. हाच उद्देश डोळ्यासमोर “शौर्या तुला वंदितो” ह्या उपक्रमाची सुरवात करण्यात आली. म्हणूनच राष्ट्राच्या संरक्षणासाठी सदैव तैनात असलेले जवान म्हणजे राष्ट्राचे प्रमुख आधारस्तंभ. त्यांच्या या कार्याच्या प्रती कृतज्ञता म्हणून, तसेच सन १९६५ चे भारत पाकिस्तान युद्ध, सन १९७१ चे पाकिस्तान विरूद्धचे युद्ध, सन १९९९ चे कारगिल युद्ध. या युद्धात शौर्य गाजवून नीच वृत्तीच्या पाकिस्तान सारख्या देशाला नामोहरम करणाऱ्या भारतमातेच्या वीर जवानांचा ऐतिहासिक कृतज्ञता सन्मान म्हणून शौर्या तुला वंदितो या कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत असते. तसेच देशाच्या अंतर्गत संरक्षणासाठी असलेल्या, तसेच नक्षलवादविरोधी सदैव लढणाऱ्या पोलीस अधिकारी व जवानांचा सन्मान ह्या सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात आला आहे. इतकंच नाही तर वीरमाता, वीरपत्नी यांचाही सन्मान ह्या ऐतिहासिक कृतज्ञता सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात आला आहे. याच बरोबर प्रत्यक्ष युद्धभूमीवर घडलेले प्रसंग प्रत्यक्ष त्या जवानांच्या तोंडून ऐकण्याचं सद्भाग्य आम्हा सर्व सह्याद्रीच्या दुर्गसेवकांना ह्या ऐतिहासिक कृतज्ञता सन्मान सोहळा म्हणजेच शौर्या तुला वंदितो च्या माध्यमातून ऐकण्यास मिळत असते.

शौर्या तुला वंदितो

जागर दुर्ग इतिहासाचा

गडकोट हे आपल्या राष्ट्राचा आत्मा आहेत. आज इतिहासातून हे गडकोट इतिहासातून बाजूला केले तर आपल्या इतिहासाला कसलाही अर्थच राहणार नाही. आजही कित्येक गडकोट पाहण्यास गेले असता अनेक ऐतिहासिक वास्तू आपल्याला समजतही नाही. करण त्यांच्याजवळ त्यांची माहिती अथवा त्या वास्तूचे नाव नसते. हा सगळा अभ्यास करून संस्थेच्या माध्यामतून “जागर दुर्ग इतिहासाचा” या उपक्रमाची सुरवात करण्यात आली. या उपक्रमाच्या अंतर्गत महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यावर प्रतिष्ठान च्या माध्यामतून किल्ल्यावर ऐतिहासिक माहिती फलक, सूचना फलक, किल्ल्याकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक, किल्यावर असणाऱ्या ऐतिहासिक वास्तूंसाठी स्थळ दर्शक फलक लावण्यात आले आहेत. तसेच या मोहिमांच्या माध्यामतून राज्यातील किमान १०० हून अधिक किल्ल्यांवर अशा मोहीम राबविण्याचा प्रतिष्ठान चा मानस आहे.

(+91) ९७७३६९४८७७

complaints@sahyadripratishthan.com