वज्रगड / रुद्रमाळ – Vajragad

चढाई श्रेणी: कठीण
जिल्हा: पुणे
तालुका: पुरंदर

ज्रगडाची समुद्रसपाटीपासूनची उंची १३४८ मीटर एवढी आहे.

पुणे जिल्ह्यातील वज्रगड अथवा रुद्रमाळ या नावाने ओळखला जाणारा हा पुरंदरकिल्ल्या शेजारील गड. एका दंतकथेनुसार गौतम ऋषींच्या शापातून मुक्त होण्यासाठी देवेंद्राने ज्या इंद्रनील पर्वतावर तपःसाधना केली तो इंद्रनील पर्वत म्हणजे आजचा पुरंदर. पुरंदर हे इंद्राचेच एक नाव आहे. इंद्रनील पर्वतरांगांवर बांधलेला हा किल्ला म्हणून त्याचे नाव ‘पुरंदर’ ठेवले गेले अशी एक दंतकथा आहे. तर ‘पुरंदराचे’ म्हणजे ‘इंद्राचे शस्त्र ते वज्र’ म्हणून किल्ले पुरंदरासमोर बांधलेला हा पुरंदराचा जुळा किल्ला म्हणजे ‘वज्रगड’. रुद्रेश्वर उर्फ शिव हा वज्रगडाचा अधिपती म्हणवला जातो. वज्रगडावर या रुद्रेश्वराचे एक मंदीरही आहे. या रुद्रेश्वराच्या अधिवासामुळे ‘वज्रगडाला’ रुद्रमाळही म्हणले जाते. याबद्दल एक पुराणकालीन दंतकथा अशीही सांगितली जाते की राम-रावण युद्धादरम्यान मुर्छीत झालेल्या लक्ष्मणासाठी मारुतीरायाने द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला. तो लंकेकडे जात असताना मध्येच द्रोणागिरीचा एक तुकडा तुटून पडला, तोच हा नारायणपुराजवळील इंद्रनील पर्वतरांगांचा भाग. नंतर इथे यादव राजांनी पुरंदर आणि वज्रगडाचे बांधकाम केले. पायथ्याशी असलेल्या भिवडी गावापासुन, रडतोंडीच्या घाटातुनही किल्ल्यावर जाता येते.

इतिहास
शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंग, दिलेरखानच्या सैन्याने पुरंदर व वज्रगडाला वेढा घातला होता. त्यातील वज्रगड हा पुरंदरपेक्षा काकणभर लहान असल्याने त्यावर आधी तोफांचा भडीमार करायचे ठरले. मुघल सैन्याकडे अब्दुल्लाखान, फतेहलश्कर व माहेली अशी तीन अजस्त्र तोफा होत्या. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वज्रगडाची लढाई चांगलीच रंगली होती.
दिलेरखानला त्या तोफा उंच चढवून वज्रगडाच्या तटावर रोकायच्या होत्या. तीन दिवसाच्या अथक परीश्रमानंतर पहिली तोफ इच्छित स्थळी पोहोचली. त्यानंतर आणखी साडेतीन दिवसांनंतर दुसरी तोफ, फतेहलश्कर तिथे पोहोचली.

त्यानंतर तिसरी तोफ माहेली सुद्धा तिथे पोहोचली. त्या तिन्ही तोफांचा मारा एका बुरुजावर केला जात होता. शेवटी १३ एप्रिल ला त्या बुरुजाने मान टाकली व मुघलांनी गडावर प्रवेश केला. आतील सैन्याने त्यांना प्रतिकार केला पण फार वेळ त्यांना ते थांबवू शकले नाहीत.
दुसऱ्या दिवशी मराठ्यांनी पराभव स्विकारला. त्यांना बंदी बनवून जयसिंहाकडे पाठवले गेले. मुरलेल्या मुत्सद्दीसारखे त्याने सगळ्यांना बिनशर्त सोडून दिले. पुरंदरवरच्या शिबंदीनेही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गड सोडून द्यावा ह्यासाठी त्याने हा मोठेपणा दाखवला होता.
१४ एप्रिल १६६५ ला वज्रगड पडल्यावर आता तोफांचा भडीमार झेलण्याची पुरंदरची पाळी होती. दिलेरखानने तोफखान्याच्या व सैन्यातील वीरांचा सन्मान केला. तोफखान्याच्या अचूक माऱ्यामुळे मुघलांना गडात प्रवेश मिळवता आला होता.