Blog page

वैराटगड

किल्ल्याची उंची: ३३४० फूट

किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग

डोंगररांग: महाबळेश्वर

चढाई श्रेणी: मध्यम

जिल्हा: सातारा

तालुका: वाई

वैराटगड हा सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील किल्ला आहे. वाई पासून ८ कि.मी. अंतरावर असणाऱ्या ह्या किल्ल्यावर जाण्यासाठी पुणे-सातारा मार्गावरील कुठलीही गाडी पकडुन भुईंजच्या थोडेसे पुढे पाचवड नावाच्या गावाला उतरावे, तिथुन आसले किंवा शंकरनगरला जाण्यासाठी बस, खासगी वाहने असे पर्याय उपलब्ध आहेत. गड आटोपशिर आहे दोन पाण्याचे तळी, एकुण तीन मंदिरे आहेत दोन हनुमानाची आणि एक वैराटेश्वराचे.इतिहासवैराटगड हा शिलाहार राजा भोज ह्याने अकराव्या शतकात बांधला. शिवकाळातही किल्ला केवळ एक लष्करी ठाणे म्हणूनच वापरात होता. शिवरायांनी जेव्हा वाई प्रांत जिंकला तेव्हा ह्या परिसरातील वैराटगड, पांडवगड हे किल्ले देखील स्वराज्यात सामील करून घेतले. पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला.गडावरील पहाण्यासारखी ठिकाणेगडमाथा फारच लहान आहे. गडावर थोड्याफार प्रमाणात काही पडक्या वस्तूंचे अवशेष आहेत. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस कड्याच्या खालच्या बाजूस पाच ते सहा टाकी आहेत. उजव्या बाजूस छोटी गुहा आहे. साधारणतः २० ते २५ पायऱ्या चढून आपण गडावर पोहचतो. डाव्या हातालाच मारुतीचे मंदिर आहे. तर मंदिराबाहेर सुद्धा मारुतीची एक मूर्ती आहे. आजुबाजूला काही प्रमाणात चौथरे दिसतात. गडाची तटबंदी अजूनही बऱ्याच प्रमाणात शाबूत आहे. गडावर एक सदर आहे. तिची रुंदी साधारण १० फूट आहे. गडाच्या प्रवेशद्वाराच्या विरुद्ध दिशेला कड्यामध्ये एक खाच आहे ह्यातून म्हसव गावाकडे उतरता येते. त्याच्या जवळच एक उंचवटा आहे. तेथे दगडावर अस्पष्ट असे लिखाण आहे. गडाच्या आजुबाजूला अनेक अवशेष इतस्थतः पसरलेले आढळतात. थोडे शोधकार्य केल्यास आणखी काहीतरी सापडू शकेल. गड फिरण्यास १ तास लागतो. किल्ला भ्रमंतीच्या वेळी किल्ल्यावर आग लागली होती, यात कित्येक लहान मोठे किडे, उपयोगी वनस्पती जळून खाक झाली असतील, यात जीवित हानी देखील होऊ शकते. गड किल्ल्यांवरील आग विझवण्यासाठी कुठलीही उपाययोजना नाही त्यामुळे होणाऱ्या नुकसानीबद्दल खूप वाईट वाटते, शासनाच्या उदासीनतेमुळे नवीन बांधकाम, संवर्धन तर दूरच परंतु जपणूक सुद्धा होत नाही याची खंत वाटते. गड किल्ल्यांना भेट देणाऱ्या सर्वांनी सावध राहून भ्रमंती करावी.

गडावर जाण्याच्या वाटा

गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. त्यासाठी व्याजवाडीला पोहचावे. वाई सातारा मार्गावर ४ कि.मी. वर कडेगाव पूल येथे उतरावे. येथून व्याजवाडी या गावात यावे. गावातून गडावर जाण्यास दोन वाटा आहेत. एक वाट चांगली मळलेली आहे. मात्र ही जरा फिरून जाते. तर दुसरी वाट डाव्या बाजूस नाकाडावरून जाते. साधारणतः या वाटेने गड गाठण्यास अर्धा तास लागतो. तर पहिल्या वाटेने १ तास लागतो. पुढे दोन्ही वाटा एकत्र मिळतात आणि १० मिनिटे गडमाथा गाठण्यास लागतो शेवटच्या टप्प्यावरची वाट प्रचंड निसरडी आहे. व्याजवाडीच्या विरुद्ध बाजूस म्हसव नावाचे गाव आहे, या गावातून खूप निसरडी वाट आहे.गडावरील मारुती मंदिरात अंदाजे ८ ते १० जणांची राहण्याची सोय होते,

जेवणाची सोय आपणच करावी. प्रवेशद्वाराच्या डावीकडे ५ ते ६ पिण्याच्या पिण्याच्या टाक्या आहेत.

छायाचित्र साभार :- नवनाथ विठ्ठल आहेर