पिसोळ किल्ला – Pisol Fort

किल्ल्याची ऊंची: ३५०० फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: गाळणा टेकड्या
श्रेणी : मध्यम
जिल्हा: नाशिक
तालुका: सटाणा
नाशिकच्या उत्तरेस बागलाण विभागात सेलबारी – डोलबारी रांगेच्या मागे एक डोंगररांग आहे, त्यांचे नाव गाळणा टेकड्या. या परिसरातील टेकड्र्‍यांची वैशिष्ट्ये असे की त्यांची उंची कमी आहे. पिसोळ, डेरमाळ, गाळणा आणि कंक्राळा हे या रांगेमधील येणारे किल्ले आहेत.

पहाण्याची ठिकाणे
किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाचे फक्त अवशेष शिल्लक आहेत. दरवाजा पूर्णपणे ढासळला आहे. किल्ल्याचे वैशिष्ट्ये म्हणजे तटबंदी, ही चार स्तरांवर एकमेकांना समांतर अशी उभारली आहे. यामुळे खिंडीला आपोआपच संरक्षण मिळाले आहे. पहिल्या दरवाजाच्या डावीकडच्या तटबंदीमध्ये एक बुरुज अजुनही तग धरुन उभा आहे. थोडेसे वर गेल्यावर किल्ल्याचा दुसरा ढासळलेला दरवाजा लागतो. उजवीकडे तटबंदी सुध्दा आहे येथून “यू” आकाराचे वळण घेतले की, तिसरा दरवाजा लागतो. इथून उजवीकडे किल्ल्याच्या उजव्या कड्याच्या जवळ वाट जाते. इथे कड्यात खोदलेल्या दोन गुहा आहेत. एका गुहेत पाणी आहे, तर एक गुहा मुक्कामास एकदम योग्य अशी आहे. गुहेच्या समोरच एक दरवाजा आहे. येथून कड्याला डावीकडे ठेवत जाणारी वाट डेरमाळकडे जाते. पण आपण गुहा पाहून तिसर्‍या दरवाज्यापाशी यायचे. दरवाज्यातून डावीकडे वळल्यावर सुध्दा कातळात कोरलेल्या तीन गुहा आहेत. या गुहा खूप खोल आहेत. सध्या तिथे वटवाघूळांची गर्दी खूप झाली आहे. एका गुहेत पाणी सुध्दा आहे. गुहा पाहून पुढे चढणीला लागायचे पुन्हा रस्ता इंग्रजी “यू” आकाराचे वळण घेऊन चौथ्या दरवाज्यापाशी येऊन पोहचतो. इथेच उजवीकडे आणि डावीकडे बुरुज आहे. पाच मिनिटे चढून गेल्यावर आपण खिंडीत पोहचतो.
पण तत्पुर्वी डावीकडे कड्यामध्ये तीन गुहा आहेत. या गुहांमध्ये पाण्याची टाकी आहेत. यातील पाणी पिण्यास योग्य आहे. मधल्या गुहेच्या समोरच एक नंदी आहे. मात्र शंकराची पिंड पाण्याखाली आसल्यामुळे दिसत नाही. गुहा पाहून खिंडीत पोहचायचे आणि गडमाथा गाठायचा. माथ्यावर पोहचल्यावर किल्ल्याचा खरा घेरा आपल्याला समजतो. किल्ल्याला तिन्ही बाजूला पठार आहे. आपण प्रथम डावीकडे वळायचे, समोरच तोफगोळा पडलेला दिसतो, तो पाहून परत डावीकडे वळायचे आणि माथा चढायला लागायचे. थोड्या (चार – पाच) पायर्‍या चढून गेल्यावर जमिनीत कातळात खोदलेली पाण्याची दोन टाकी आहेत. पाण्यावर शेवाळे साचलेले आहे. टाक्र्‍यांच्या उजवीकडे कमानी सारखे बांधकाम दिसते, तर डावीकडे वर एक दर्ग्यासारखी इमारत दिसते. तिथे जाण्यापूर्वी आपण टाक्र्‍यांच्या डावीकडे तिरपे चालत जायचे. तिथे उघड्यावर पडलेली हनुमानाची आणि गणेशाची मूर्ती आहे. त्र्‍यांना नमस्कार करुन उजवीकडे तिरपे वळायचे आणि कमानीयुक्त बांधकामापाशी पोहचायचे. हे बांधकाम एखाद्या मोठ्या वाड्याचे असावे. याच्या कमानीवर कमलपुष्पे कोरलेली आहेत. आतील चौथर्‍याचा भाग पूर्णपणे नष्ट झालेला आहे. भिंतीपण पूर्णपणे नष्ट झालेल्या दिसतात. कमान पाहून आणखी उजवीकडे गेले की किल्ल्याचा कडा लागतो, येथेही एक खिंड असल्याचे दिसून येते. हा भाग पाहून पून्हा कमानीपाशी यायचं आणि वर असणार्‍या दर्ग्यासारख्या इमारतीपाशी पोहचायंच. हे बांधकाम थोडेसे मंदिरासारखे दिसते. याला आतमधील बाजूस कोनाडे आहेत. एका कोनाड्यात गणेशाचे शिल्प आहे. वास्तू बर्‍यापैकी सुस्थितीमध्ये आहे.
याच्या मागून एक वाट किल्ल्याच्या टोकाला जाते. वाटेत काही घरांचे आणि वाड्र्‍यांचे अवशेष आहेत. मध्येच पाण्याची एक दोन टाकी सुध्दा आहेत. या टाक्र्‍यांमधील पाणी मात्र खराब आहे. टोकाला तटबंदी आहे ती सुध्दा नावापुरतीच शिल्लक असल्याची दिसते. हे सर्व पाहून किल्ल्याच्या खिंडीपाशी पोहचायचे. आता खिंडी पासून बरोबर विरुध्द दिशेला असणार्‍या खिंडीपर्यंत जायचे ही जागा म्हणजे आपण ज्या वाटेने आलो त्याच्या एकदम विरुध्द बाजूला असणारी जागा. या खिंडीत काही तटबंदीचे अवशेष आहेत. शिवाय पडक्या दरवाजाचे अवशेषही आहेत, पण ही वाट खूप खराब असल्याने हे सर्व लांबूनच पाहायचे आणि खिंडीपर्यंत परतायचे. आता मोहरा वळवायचा तो उजव्या बाजूच्या पठारावर, या पठारावर काही झाडे आहेत. तिथेच एक मोठे तळे सुध्दा आहे, पण ते पूर्णपणे सुकलेले आहे. ते पाहून शेवटच्या टोकाच्या दिशेने निघायचे.
वाटेत एके ठिकाणी झुडुपांमध्ये महादेवाचे छोटेसे मंदिर आहे. हे मंदिर फक्त एका छोट्याश्या चौथर्‍यावर उभे आहे. पुढे अजून एक चौथरा आहे, ती समाधी असावी, त्याच्या समोर मोराचे शिल्प सुध्दा आहे. या चौथर्‍याच्याच थोडेसे पुढे डावीकडे पाण्याची टाकी आहेत. या टाक्यातील पाणी खराब आहे. त्याच्या थोडेसे पुढे एक सुकलेले तळे आहे. इथून किल्ल्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहचण्यास १५ मिनीटे लागतात. शेवटच्या टोकाला एक बुरुज आहे. त्या बुरुजामध्येच एक गुप्त दरवाजा चिणून काढला आहे. समोरचा डोंगर आणि किल्ल्याच्या मध्ये बरोबर धोडपच्या माची सारखी खाच आहे. ती फक्त आकाराने लहान आहे. किल्ल्याचा हा भाग चांगल्या तटा बुरुजाने संरक्षित केला असल्यामुळे इथून शत्रूने हल्ला करणे अशक्यच आहे, उलट वेळप्रसंगी पळून जाण्यासाठी इथे गुप्त दरवाजा आहे. किल्ल्यावरुन डेरमाळचा भैरवकड्याचे खूप छान दर्शन होते. एका बाजूला मांगी तुंगीचे सुळके दिसतात. संपूर्ण गड फिरण्यास तीन तास लागतात.
पोहोचण्याच्या वाटा
पिसोळला जायचे असल्यास नाशिक – सटाणा मार्गे ताहराबाद गाठायचे. नाशिक पासून ताहराबाद १०५ किमीवर आहे. ताहराबाद – मालेगाव रस्त्यावर ताहराबाद पासून ८ किमीवर जायखेडा नावाचे गाव आहे. ताहराबाद पासून जायखेड्याला जाण्यास एसटी किंवा सहा आसनी गाड्या मिळतात. जायखेड्या पासून वाडी पिसोळ पर्यंत ५ कि.मी. कच्चा रस्ता आहे. जायखेड्या पासून वाडी पिसोळ पर्यंत सहा आसनी गाड्या मिळतात. जर गाडी नाही मिळाली तर आपली पायगाडी चालू ठेवायची. पिसोळवाडी मधून किल्ल्याच्या दिशेला निघाल्यावर एक मारुतीचे मंदिर आहे. येथून किल्ल्याच्या मधोमध असणारी खिंड दिसते. ही खिंड म्हणजेच आपले लक्ष्य होय. किल्ल्याच्या दोन कड्र्‍यांमुळे ही खिंड तयार झालेली आहे. मंदिरा पासून निघाल्यावर सुमारे पाऊण तासानंतर आपण किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो.
राहाण्याची सोय: किल्ल्याच्या दुसर्‍या दरवाजाच्या उजवीकडे कातळातील गुहांमध्ये ५ ते १० जणांना रहाता येते.

जेवणाची सोय: जेवणाची सोय स्वत:च करावी

पाण्याची सोय: किल्ल्याच्या दुसर्‍या दरवाजाच्या उजवीकडे कातळातील गुहांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. खिंडीच्या जवळ डावीकडच्या गुहेमध्ये सुध्दा पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ: वाडी पिसोळ मार्गे १ तास लागतो.