पारोळा किल्ला
किल्ल्याचा प्रकार: भुईकोट
जिल्हा: जळगाव
पारोळा किल्ला हा झाशीच्या राणीचा किल्ला असून झाशीच्या राणीचे हे माहेर आहे. शहराच्या सुरुवातीला झाशीच्या राणीचा व शिवाजी महाराजांचा सुदर् असा पुतळा आहे. शहराच्या जवळच विचखेडे नावाचे छोटेसे शहर आहे.सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात पारोळा भुईकोट बांधण्यात आला. हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात सुंदर व मोठा भुईकोट आहे. या भुईकोटला बाहेरच्या बाजूने जरी अतिक्रमणाचा विळखा पडला असला, तरी पुरातत्व खात्याने केलेल्या डागडूजीमुळे किल्ला सुस्थीतीत आहे. मुख्य किल्ला व बालेकिल्ला अशा दोन भागात असणार्या या किल्ल्यात भूईकोटची सर्व वैशिष्ट्ये पाहायला मिळतात.इतिहासइ.स. १७२७ मध्ये जहागिरदार हरी सदाशिव दामोदर याने हा किल्ला बांधला याची लांबी १५७.५ मीटर व रुंदी १३०.५ मीटर आहे.इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी या भागावर सत्ता प्रस्थापित केली, पण किल्ला जहागिरदारांच्या ताब्यात ठेवला. इ.स. १८२१ मध्ये पारोळ्यात इंग्रजाविरुध्द बंड झाले, त्यावेळी कॅप्टन ब्रिग्र याला ठार मारण्याचा स्थानिकांनी प्रयत्न केला होता. याचा ठपका लालभाऊ झाशीकर यांच्यावर ठेवून पारोळा किल्ला झाशीकर यांच्याकडून इंग्रजांनी हस्तगत केला.इ.स. १८५७ च्या उठावात झाशीच्या राणीला मदत केलेच्या आरोपावरुन इंग्रजांनी जहागिरदारांची सर्व संपत्ती जप्त केली.पहाण्याची ठिकाणेगडाच्या उत्तराभिमुख प्रवेशद्वाराने आपण गडात प्रवेश करतो. आत आल्यावर दोन्हीबाजूंना पहारेकर्यांसाठी देवड्या दिसतात; तर समोर १५ फूट उंच तटबंदी दिसते. इथून काटकोनात वळल्यावर गडाचे दुसरे प्रवेशद्वार दिसते. प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोरच बालेकिल्ल्याचा भक्कम चौकोनी बुरुज त्यात असलेल्या खिडक्या, झरोके, जंग्या आपल्याला दिसतात. या बुरुजाखाली गणपतीचे मंदिर व विहीर आहे.प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूने किल्ला पाहाण्यास सुरुवात करावी. डाव्या हाताला एकामागोमाग उभ्या असलेल्या पण पडझड झालेल्या कमानी दिसतात. एकेकाळी त्र्यांच्यावर फांजी बांधलेली असावी. या कमानीं जवळच एक चौकोनी विहीर आहे. कमानीकडून पुढे आल्यावर तटबंदीवर चढण्यासाठी जिना आहे. या पूर्वेकडील तटबंदीच्या बाजूस तलाव आहे. (पारोळाकरांनी या तलावाच्या सर्व बाजूंनी अतिक्रमण केल्यामुळे व तलावात केरकचरा टाकल्यामुळे त्याची शोभा गेली आहे) या तलावात उतरण्यासाठी तटबंदीखाली दोन ठिकाणी चोर दरवाजे आहेत. तसेच दरवाजे तलावाच्या विरुध्द बाजूस पारोळा गावात आहेत. पूर्वेच्या तटबंदी समोर महादेवाचे छोटे मंदिर आहे. या मंदिराजवळ भूयार असून ते ८ कि. मी. वरील नागेश्वर मंदीरात उघडते असा स्थानिकांचा दावा आहे. मंदिराच्या पुढे किल्लेदाराच्या दुमजली वाड्याचे अवशेष आहेत. वाड्याच्या मागे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला एक विहीर आहे.बालेकिल्ल्याला चार बाजूला चार गोलाकार २५ फूटी भव्य बुरुज आहेत. या बुरुजांच्या मध्ये चार चौकानी बुरुज आहेत बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यामुळे पश्चिमेला असलेल्या चोर दरवाजाने बालेकिल्ल्यावर प्रवेश करावा लागतो. बालेकिल्ल्यावर दक्षिणेकडील तटबंदीला लागुन ३ घरांचे अवशेष दिसतात. त्या किल्ल्यावरील कचेर्या असाव्यात. बालेकिल्ल्यात असलेल्या दोन विहीरीतील पाणी हौदात ओतून ते या कचेर्यांपर्यंत खेळवण्यात आले होते, ते चर आजही पाहायला मिळतात. या कचेर्यांच्या समोर सुशोभित केलेला हौद व कारंजे होते, त्र्यांचे अवशेष पहायला मिळतात. कचेर्यांच्या भिंतीत जंग्र्यांची रचना केलेली आहे. कचेर्यांच्या बाजूला असलेल्या पूर्वेकडील बुरुजात दारुकोठार आहे. या कोठारालाही सर्व बाजूंनी जंग्या आहेत.गडाच्या तटबंदीला फिरण्यासाठी फांजी आहे व तटबंदीत जागोजागी जंग्यांची रचना केलेली आहे. तटबंदी भोवती दगडांनी बांधलेला १० फूट x १० फूट खंदक आहे. पूर्वेकडील बुरुजावर ध्वजस्तंभ आहे. पूर्वीच्याकाळी प्रवेशद्वारासमोर उचलता येणारा लाकडी पूल होता.
पोहोचण्याच्या वाटा: पारोळा हे जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर रस्त्याने देशाशी जोडलेल आहे. पारोळा जरी जळगाव जिल्ह्यात असले तरी ते धुळे शहरापासून जवळ आहे. धुळे – जळगाव रस्त्यावर धुळ्यापासून पारोळा ३५ किमीवर आहे. अंमळनेर पासून पारोळा २२ किमीवर आहे. पारोळा गावातील बाजारात दुकानांच्या रांगेमध्ये किल्ल्याचे प्रवेशव्दार आहे.
राहाण्याची सोय: गडावर राहण्याची सोय नाही, पारोळा गावात होऊ शकते.
जेवणाची सोय: जेवणाची सोय नाही, पारोळा गावात होऊ शकते.
पाण्याची सोय: गडावर पाण्याची सोय नाही.सूचनाधुळ्याहून – अंमळनेर – (२१ किमी) पारोळा – (८ किमी) बहादरपूर हे किल्ले एका दिवसात पाहाता येतात.


1 Comment

Pankaj Patil · March 15, 2018 at 9:21 am

Jay shivray

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *