मोरागड – Moragad Fort
किल्ल्याची ऊंची: ४४५० फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: बागलाण
श्रेणी: मध्यम
जिल्हा: नाशिक
तालुका: सटाणा

भौगोलिक दृष्टया पाहिले तर मोरागड हा मुल्हेर किल्ल्याचाच एक भाग आहे. मोरागड म्हणजे मुल्हेर किल्ल्याचा दुसरा बालेकिल्लाच होय. इतिहासात या गडाचा स्वतंत्र असा उल्लेख करणारे एकही कागदपत्र उपलब्ध नाही.

पहाण्याची ठिकाणे
गडमाथ्यावर जाताना दुसर्‍या दरवाजाच्याजवळ एक गुहा आहे. गडमाथा म्हणजे एक पठारच होय. माथ्यावर दोन ते तीन पाण्याची टाकी आहेत. एक सुंदर बांधीव तलाव आहे. दोन तीन वाड्यांचे अवशेष आपले अस्तित्व टिकवून आहेत. बाकी गडावर काही नाही. गडावरून मुल्हेरचे पठार व माची, हरगड, मांगीतुंगी, न्हावीगड, तांबोळ्या, हनुमान टेकडी यांचे विहंगम दृश्य दिसते.

पोहोचण्याच्या वाटा
मोरागडावर जाणारी एकच वाट आहे. ती मुल्हेरगडाच्या बालेकिल्ल्यावरून जाते. मुल्हेरगडाच्या बालेकिल्ल्यावर भडंगनाथाच्या मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर उजवीकडे वर जाणारी वाट पकडावी. या वाटेने थोडे वर गेल्यावर समोरच खाली मोरागडाकडे जाणारी वाट दिसते. येथून मोरागडावर जाण्यास अर्धा तास पुरतो. मुल्हेरमाचीवर असणार्‍या सोमेश्वर मंदिरापासून वर जाणारी वाटसुद्धा मोरागडावर जाते. पुढे या दोन्ही वाटा एकमेकांना मिळतात. गडावर जातांना तीन दरवाजे लागतात.