खर्डा किल्ला / सुलतानगड
जामखेड तालुक्यातील परमुख गावांमधील एक असलेल्या खर्डा गावात पुरातन, ऐतिहासिक असा भुईकोट किल्ला आहे. गावाच्या बाजूला असलेला हा किल्ला निंबाळकर सरदारांनी बांधला आहे.

इतिहास:
इतिहासातील प्रसिद्ध खरड्याची लढाई हि याच ठिकाणी झाली होती. हैदराबादचा निजाम व मराठ्यांमध्ये ११ मार्च १७९५ रोजी लढाई झाली. त्यात मराठ्यांनी निजामाचा पराभव केला होता. जामखेड तालुक्यातील शिर्डी-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील खर्डा हे गाव ऐतिहासिक वास्तुचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. मराठवाड्यातून नगर जिल्ह्यात प्रवेश करताना भव्य तटबंदी असलेला भुईकोट किल्ला प्रवाशांचे लक्ष वेधून घेतो.
ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या व मराठय़ांच्या शेवटच्या विजयाच्या अजराअमर आठवणी असलेल्या खडर्य़ाच्या लढाईला २१८ वर्ष पूर्ण झाले आहेत. ११ मार्च १७९५ ला झालेल्या या लढाई नंतर मराठय़ांना विजयाचे तोंड पाहता आले नाही. पण या भागाचा पर्यटन व तीर्थक्षेत्र यादृष्टीने विकास होवून येथे एक स्मारक झाले तरच एक मोठी आदरांजली येथील हुतात्म्यांना ठरेल.
खर्डा येथील ऐतिहासिक संदर्भ असलेल्या वास्तूची आता पडझड झाली आहे. भुईकोट किल्ला, निंबाळकर गढी व समाधी, बारा प्रतिज्योतिलिंग मंदिरे आदींचा समावेश ‘क’ वर्ग पर्यटन व तीर्थक्षेत्र अशा दोन्ही आराखड्यात करण्यात आला आहे. राज्यशासनाने भूईकोट किल्ल्यासाठी आठ कोटीचा आराखडा मंजूर केला आहे. त्यातील एक कोटीचे पहिल्या टप्पातील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे.
किल्ल्याची दुरुस्ती व मजुबतीकरणा सोबतच सुशोभिकरण, अंतर्गत बागबगीचा, ध्वनीप्रकाश परिणामाद्वारे इतिहास कथन, वाहनतळ, स्वच्छतागृह आदी आठ कोटी रुपयांच्या कामाद्वारे किल्ल्याचे रुप पालटणार आहे.
मराठय़ांच्या गौरवशाली, संस्मरणीय, अभिमानास्पद विजयाचा साक्षीदार असलेल्या खडर्य़ाचा भुईकोट किल्ला व इतर ऐतिहासिक वास्तूंचा पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास खर्डा हे एक प्रेरणा स्थळ ठरेल.