करमाळा शहर किल्ला
किल्ल्याचा प्रकार: भुईकोट
श्रेणी: सोपी
जिल्हा: सोलापूर
तालुका: करमाळा
करमाळा शहर किल्ला बांधती बापलेक । त्येंच्या भोवती खंदक ।।करमाळा शहर ओळखू येत मौलालीनं। करतो राखण माळावरनं ।।या लोकगीतामध्ये वर्णन केलेले करमाळा शहर म्हणजे रंभाजीराव निंबाळकरास पुण्याच्या जहागिरीच्या मोबदल्यात मिळालेल्या जहागिरीमधील मुख्य गाव होय. निबाळकरांनी उभारलेल्या या वास्तूमध्ये केवल विविधता होती असे नाही. तर उत्तर व दक्षिण स्थापत्याचा सुरेख संगम साधलेला होता. स्थापत्य पध्दती तर अशी की, तिच्यात हिंदू स्थापत्य शास्त्राचा मूळ बाज राखूनही मुस्लिम शैलीची प्रचिती सहज यावी. मग ते आदर्श व्यक्तीचे कला मंदिर असो अथवा एखाद्या सूफी साधूंचा दर्गा असो किंवा एखादे शिवमंदीर असो, सर्वधर्म समभाव दर्शवणारी एवढी प्रतिके निंबाळकरांच्या जहागिरी व्यतिरिक्त उभ्या महाराष्ट्रात कोठेच आढळत नाहीत. रावरंभा निंबाळकराने करमाळ्यामध्ये सूफी संत हजरत करमे मौला यांचा दर्गा गावाच्या दक्षिणेला माळावर बांधलेला आहे. हे सूफी संत दीर्घकाळ करमाळा येथे वास्तव्य करून होते. मात्र त्यांचा कालखंड आजही उपलब्ध नाही. या सूफी संताच्या करमे मौला या नावावरूनच या गावाला करमाळा असे नाव पडले असावे असे सांगितले जाते.रंभाजीराव उर्फ रावरंभा हा तुळजापूरच्या क्षेत्र तेजस्विनी तुळजा भवानीचा परमभक्त होता. या आदिशक्तीचे एक भव्य मंदिर उभारण्यापर्यंत कल्पना करमाळे शहराच्या पूर्वेस एक तुलनात्मक मंदिर उभे करून त्यांनी प्रत्यक्षात आणली. तुळजापूरची भवानी माता आपल्या परमभक्तांसाठी त्याच्या मागे पायी चालत येऊन करमाळे शहरात पावन करती झाली, अशी दंतकथा आजही सांगितली जाते. या मंदिरा बरोबर त्याने करमाळ्यात अठरा बुरजांनी युक्त असा भुईकोट किल्ला बांधला आहे.