Blog page

जंगली जयगड
किल्ल्याची ऊंची: ३१६४ फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: महाबळेश्वर कोयना
श्रेणी: मध्यम
जिल्हा: सातारा
तालुका: पाटण
सातारा जिल्ह्यातील कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ धरण आहे. या धरणाच्या भिंतीजवळ कोयनानगर हे छोटस टुमदार गाव वसलेल आहे. या गावापासून १२ किमीवर जंगली जयगड हा किल्ला आहे. या किल्ल्यावर व आजूबाजूस असलेल्या दाट जंगलामुळे या किल्ल्याला जंगली जयगड हे नाव देण्यात आले होते. आजही या भागात दाट जंगल असून जंगलात वाघ, बिबटे, अस्वल इत्यादी प्राणी असल्याने या गडावर कोणीही रात्री मुक्काम करत नाही. घाटमाथ्याच्या टोकावर असणार्या या किल्ल्यावरून कोकणाच विस्तृत दर्शन होते. या गडाचे स्थान पहाता याचा उपयोग कुंभार्ली घाटावर व आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी होत असावा. हा किल्ला चढण्यास सोपा असून गर्द जंगलातून जाणार्या रस्त्यामुळे हा एक दिवसाचा ट्रेक अल्हाददायक होतो.
इतिहास:
कुंभार्ली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी इतिहास काळात जंगली जयगडची निर्मिती करण्यात आली. शिवकाळात हा गड शिवाजी महाराजांच्या अमलाखाली होता. इतिहासात याच्या शेजारील हेळवाक हे गाव बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे जंगली जयगडचा समावेश हेळवाक महालात होत असे. पुढे १७५८-५९ मध्ये पंतप्रतिनिधींकडील हा किल्ला पेशव्यांचे सरदार खंडोजी मानकर यांनी घेतला, पण पेशव्यांनी याचा ताबा परत पंतप्रतिनिधींकडे देण्यास सांगितले. पुढे १८१० मध्ये प्रतिनिधींची आश्रित ताई तेलीण हिच्या ताब्यातून पेशव्यांचा सेनापती बापू गोखले यांनी हा किल्ला जिंकून घेतला. शेवटी १८१८ च्या इंग्रज-मराठे युद्धात कर्नल हिवेट याच्या नेतृत्वाखालील फौजेने हा किल्ला जिंकून घेतला. असा हा किल्ला त्याच्या पर्यंत पोहोचेपर्यंत पार कराव्या लागणाऱ्या जंगलच्या तटबंदीमुळे जंगली जयगड हे नाव सार्थ करतो.
गडावर पाहाण्याची ठिकाणे:
जंगली जयगड किल्ला सह्याद्रीच्या मुख्य रांगेतून बाहेर आलेल्या फाट्यावर बांधलेला आहे. कोयनानगरच्या बाजूने सह्याद्रीचा मुख्य डोंगर चढून कोकणाच्या बाजूला आल्यावर समोर लांबवर पसरलेला सह्याद्रीचा फाटा व त्यावरील किल्ला दिसतो. येथेच गडाचे उव्धस्त प्रवेशव्दार आहे. झाडीत विखुरलेल्या घडीव दगडांवरून ते ओळखता येते. गडाच्या टोकाकडे जातांना आपल्याला दोन छोट्या कातळ सुळक्यांना वळसा घालून जावे लागते, या सुळक्यांना स्थानिक लोक दिपमाळ या नावाने ओळखतात. या सुळक्याच्या बाजूने पुढे गेल्यावर एक उव्धस्त / पडके मंदिर दिसते. या मंदिरात देवीची पूर्ण झिजलेली मुर्ती आहे. किल्ल्याच्या टोकावर भगवा झेंडा लावलेला आहे. किल्ल्यावरून कोकणाच विस्तृत दर्शन होत. उजव्या बाजूस खाली कोळकेवाडी धरण व त्याच्या बाजूच्या डोंगरावरील कोळकेवाडी किल्ला दिसतो. समोरच्या बाजूस दूरवर चिपळूण शहर व वासिष्टी खाडी दिसते. जर वातावरण चांगल असेल तर समुद्राची निळी रेघही दिसते. डाव्या बाजूला खाली कुंभार्ली घाट दिसतो. किल्ला छोटा असल्यामुळे ३० मिनिटात पाहून होतो.गडाच्या उजव्या हातास कोळकेवाडी जलाशय आणि किल्ल्यावर पोहोचण्यासाठी केलेला नागमोडी पोफळी घाटही व्यवस्थित न्याहाळता येतो. सभोवार तळकोकणचे रम्य दृश्य दिसते. उत्तरेस नजर फेकताच वासोटा ऊर्फ व्याघ्रगड, महिमंडणगड व मकरंदगड तर त्याच्या डावीकडे रसाळ, सुमार व महिपत ही इतिहासप्रसिद्ध दुर्गत्रयी आपणास साद घालतात. दक्षिणेला पोफळी घाटापलीकडे भैरवगड, तर तळात पार वशिष्ठीच्या काठावर निवांत पहुडलेले चिपळूण शहर आपले लक्ष वेधून घेते.
पोहोचण्याच्या वाटा:
चिपळूण – पाटण – कराड रस्त्यावर चिपळूण पासून ४३ किमीवर कोयनानगर गाव आहे. कोयना नगरहून नवजा गाव ११ किमी अंतरावर आहे. नवजा गावापर्यंत जाण्यासाठी कोयनानगरहून दर तासाला बसेस आहेत. नवजा गावापुढे पंचधारा या कोयनेवरील पहिल्या बोगद्याकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर ५०० मीटरवर एक चौकी आहे, ती ओलांडल्यावर साधारणपणे ५०० मीटरवर डाव्या हाताला एक कच्चा रस्ता डोंगरात गेलेला दिसतो. येथेपर्यंत खाजगी वहानाने जाता येते. येथून डोंगर चढण्यास सुरुवात करावी. वाट मळलेली असून गर्द झाडीतून जाते. साधारण अर्ध्या तासाने आपण पाण्याच्या झर्याजवळ पोहोचतो. या झर्याला फेब्रुवारी पर्यंत पाणी असते. येथेच एक सिमेंटचा चौथरा बांधलेला आहे. पुढे १५ मिनिटात आपण सह्याद्रीचा मुख्य डोंगर चढून कोकणाच्या बाजूला आल्यावर समोर लांबवर पसरलेला सह्याद्रीचा फाटा व त्यावरील किल्ला दिसतो. येथून किल्ल्याच्या टोकावर जाण्यास अर्धा तास लागतो. पायथ्यापासून गडावर जाण्यास सव्वा तास लागतो.
राहाण्याची सोय:
गडावर रहाण्याची सोय नाही, कोयनानगर गावात आहे किंवा नवजा गावतील शाळेत मुक्काम करता येईल.
जेवणाची सोय:
गडावर जेवणाची सोय नाही, कोयनानगर गावत आहे .पाण्याची सोय: गडावर जातांना वाटेत असलेल्या झर्यात जानेवारी – फेब्रूवारी महिन्यापर्यंतच पाणी असते.
जाण्यासाठी लागणारा वेळ:
पायथ्यापासून गडावर जाण्यास सव्वा तास (१ तास १५ मिनिटे) लागतो.सूचना:१) नवजा गावात गडावर जाण्यासाठी गाईड मिळतात त्यांना बरोबर घेउन जावे. कारण नवजा गावातून गडावर जातांना वाटेत जी चौकी लागते तेथून परवानगी असल्याशिवाय पुढे सोडत नाहीत. अशावेळी स्थानिक वाटाड्यांची मदत होते.२) किल्ल्याची वाट दाट जंगलातून जात असल्यामुळे नवजा गावातून वाटाड्या घ्यावा.३) गडावरून कोकणात उतरण्यासाठी वाट नसल्यामुळे आल्या वाटेनेच खाली उतरावे.