डेरमाळ किल्ला – Dermal Fort
किल्ल्याची ऊंची: ३७०० फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: गाळणा टेकड्या
श्रेणी: मध्यम
जिल्हा: नाशिक
तालुका: सटाणा
टिंघरी गावातून किल्ल्यावर आल्यावर उजवीकडे खाली माचीवरची तटबंदी दिसते आणि वर बालेकिल्ला दिसतो. एक वाट माचीवर डावीकडे गेलेली दिसते. त्या वाटेने पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या उत्तर बाजूला पोहचतो. इथे खराब पाण्याचे टाके दिसते. माचीच्या या भागात पाण्याचे एका टाक्या शिवाय काही नाही आहे, म्हणून पुन्हा दरवाज्यापाशी परतायचे. आता तटबंदी आपल्या उजवीकडे रहाते आणि टेकडी डावीकडे. पुढे ही वाट उजवीकडे तटबंदीच्या बाजूने पुढे जाते, तर एक वाट डावीकडे वर चढते.डावीकडच्या वाटेने गेल्यावर माचीचा पडझड झालेला दरवाजा लागतो. तो पाहून वर चढून गेल्यावर डावीकडे किल्ल्याच्या वक्राकार आकाराचा कडा लागतो, याला ‘भैरवकडा’ म्हणतात. हा कडा आपल्याला हरिश्चंद्रगडाच्या कोकण कड्याची आठवण करुन देतो. या कड्याच्या मधोमध पठारावर एक बांधकाम दिसते, हे एका वाड्याचे अवशेष आहेत. याच्या तिन्ही भिंती पूर्णपणे ढासळलेल्या आहेत. याच्या थोडे खाली पाण्याचे एक खराब टाके आहे. वाडा पाहून उजवीकडे थोडे वर जायंच तिथे सात टाक्यांचा समूह आहे. यातील पाण्यावर शेवाळे साचलेले आहे. या टाक्यांच्या खालच्या, वरच्या, आणि मागच्या बाजूसही काही टाकी आहेत. हे अवशेष पाहून थोडे आणखी वर चढायचे, इथे एके ठिकाणी उघड्यावर हनुमानाची आणि गणेशाची मूर्ती पडलेली आहे. या मूर्तीच्या बरोबर डावीकडून एक वाट खाली उतरते. इथेच एक भूमीगत गुहा खोदलेली आहे. ही गुहा १० ते १५ लोकांच्या मुक्कामा करीता योग्य आहे. गुहेच्या समोरुनच एक वाट खाली माचीवर जाते. इथेच वाटेत एक भलेमोठे टाके लागते. याचे नाव आहे ‘समुद्री’ टाके. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्यांच्या पुढून एक वाट जाते, तीच बिलपूरीला जाणारी वाट आहे. गुहेच्या वरुन एक वाट बालेकिल्ल्यावर जाते. बालेकिल्ल्यावर एक दोन वाड्यांचे अवशेष आहेत. इथून पिसोळच्या पश्चिमकड्याचे छान दर्शन होते. संपूर्ण गड फिरण्यास ३ तास लागतात.
पोहोचण्याच्या वाटा :टिंघरी गावातून नामपूर मार्गे टिंघरी हे १२ किमी चे अंतर आहे. पिसोळवरुन डेरमाळला जाणारी वाट टिंघरीत उतरुनच जाते. टिंघरीमध्ये डेरमाळची डोंगरसोंड उतरलेली आहे. ही डोंगरसोंड चढून अर्ध्यातासात आपण डेरमाळच्या पायथ्याच्या सपाटी पर्यंत पोहोचतो, पण डेरमाळच्या पायथ्या पर्यंत जाण्यासाठी दरीला वळसा घालून जावे लागते. वाटेत पठारावर एके ठिकाणी तळे आहे, पण ते पूर्णपणे सुकलेले आहे. या सपाटीवर एक हनुमानाची मुर्ती आहे. या मूर्तीच्या बरोबर समोरची एक पायवाट किल्ल्यावर जाते. लक्षात ठेवण्याची खूण म्हणजे वाट नेहमी किल्ल्याची तटबंदी डावीकडे ठेवत जावे आणि मध्येच कातळात खोदलेल्या पायर्‍या सुध्दा लागतात. ही वाट किल्ल्याच्या पडझड झालेल्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचते. टिंघरीतून किल्ल्यावर जाण्यास दोन तास लागतात.बिलपूरी मार्गे नाशिक – सटाणा – नामपूर मार्गे बिलपूरी गावात पोहचता येते नामपूर पासून बिलपूर हे गाव साधारणपणे १५ किमी वर आहे. गावात सटाण्याहून नामपूर मार्गे मुक्कामाची एसटी सुध्दा येते. जर एसटी नाही मिळाली तर नामपूर साक्री मार्गावर ‘चिराई’ नावाचे गाव आहे, तिथून ८ किमी वर चालत बिलपूरीला जाता येते किंवा नामपूर तळवडे अशा सहा आसनी गाड्या चालू असतात. तळवडे ते बिलपूरी अंतर ३ किमी पायी गाठता येते. बिलपूरी गावातून डेरमाळ दिसतो, पण तिथपर्यंत जाण्यासाठी सरळ वाट नाही. वाट जरा वाकडी करुनच जावे लागते. डेरमाळच्या समोर असणार्‍या डोंगराची सोंड बिलपूरी मध्ये उतरलेली आहे. ही डोंगरसोंड चढून गेल्यावर आपण पठारावर पोहचतो. आता डेरमाळचा किल्ला आपल्या डाव्या हाताला असतो. किल्ला आणि आपण चालत असणारे पठार यात एक दरी असते. पठारावरुन अर्धा तास चालत गेल्यावर आपण दरी जिथे संपते त्या ठिकाणी इंग्रजी ‘यू’ आकाराचे वळण घ्यायचे आणि समोरच्या पठारावरच्या जंगलात शिरावे. आता डेरमाळचा डोंगर आणि समोरचा डोंगर यांना जोडणारी खिंड आपल्या मागे रहाते. आता डेरमाळची तटबंदी आपल्या डोक्यावर उजवीकडच्या कड्यावर असते. आता वाट चढणीला लागते, वाटेत किल्ल्याच्या तीन पडझड झालेल्या दरवाज्यांचे अवशेष दिसतात. शेवटच्या दरवाज्या जवळून वाट पून्हा ‘यू’ आकाराचे वळण घेऊन डेरमाळच्या माचीवर जाते.
राहाण्याची सोय: डेरमाळ वरील गुहेत १०-१५ जणांना राहता येते.
जेवणाची सोय: गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय: डेरमाळ वरील समुद्री टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ: टिंघरी मार्गे २ तास आणि बिलपूरी मार्गे २ तास लागतात.
छायाचित्र साभार : विनीत दाते