दातेगड / सुंदरगड

दातेगड / सुंदरगड
किल्ल्याची ऊंची: ५०० फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: बामणोली
चढाई श्रेणी: मध्यम
जिल्हा: सातारा
तालुका: पाटण
महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध ऐतिहासिक गडकिल्ले आहेत. या गडांशी सातवाहनांपासून छत्रपती शिवाजीमहाराजांपर्यंत अनेकांचं नातं आहे. ज्या गडकिल्ल्यांचा इतिहास इतिहासकारांनी मांडला ते किल्ले महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. मात्र इतिहासामध्ये महत्त्वाची कामगिरी करूनही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले अनेक किल्ले प्रसिद्धीपासून वंचित राहिले. चारही बाजूंनी नैसर्गिक काळ्या कातळाची तटबंदी लाभलेल्या दातेगडाचे दुर्गवैशिष्ट्ये म्हणजे या गडावरील बऱ्याच वास्तू दगडातच खोदून तयार केल्या आहेत. सह्यादीच्या माथ्यावर तलवारीचा भव्य आकार असलेली विहीर हे याचे प्रमुख वैशिष्ट्य.पाटणपासून केवळ सहा किलोमीटर आणि कोयनेपासून केवळ २५ किलोमीटर अंतरावर असलेला घेरादातेगड शिवप्रेमी आणि पर्यटकांचे आकर्षण ठरू शकेल. दातेगडास भेट देण्यासाठी आपणास कराड-कोयनानगर मार्गावरील पाटण हे गाव गाठावे. गावातून चाफोली रोड जातो त्या रस्त्याने १५ मिनीटे चालल्यानंतर डाव्या बाजूलाच लाल मातीची मळलेली पायवाट दिसते. या पायवाटेने थोडं पुढे गेल्यावर दातेगडावरून उतरत आलेल्या डोंगरधारेस भिडायचे या रस्त्याने ४५ मिनीटे चालल्यानंतर एक दर्गा लागतो. या दर्ग्यासमोरून टेकडीच्याच धारेवरून मळलेल्या पायवाटेने आपण पठारावर पोहोचतो. तिथून साधारण २० मिनीटे चालल्यानंतर गडाच्या पायथ्याचे टोळेवाडी गाव लागते. हा भाग डोंगराळ असल्याने गडावर पोहोचण्यासाठी स्थानिक लोकांची मदत घ्यावी, अन्यथा भरकटण्याची शक्यहता आहे.शिवकालात गडावर कचेरी व कायम शिबंदी होती. या शिबंदीकरता गडाशेजारच्या गावातील जमिनी नेमून देण्यात आल्या होत्या. पुढे हा किल्ला काही काळ मोगलांच्या अधिपत्याखाली होता. मे १८१८ मध्ये कॅप्टन ग्रॅट याने हा किल्ला न लढताच जिंकला.गडाच्या पश्चिचम बाजूस भग्न प्रवेशद्वार आहे. या गडावर तलवारीचा आकार असलेली भव्य विहीर आहे. ती इतिहासकालीन शिल्प कलेची चुणूक दाखवते. किल्ल्याच्या पश्चिम टोकावर अखंड खडकात खोदलेली ही विहीर किल्ल्याच्या दक्षिणेला आहे. अखंड खडकात विहिरीत उतरण्यासाठी ४१ पायऱ्या आहेत. त्यापैकी काही पायऱ्या ढासळलेल्या अवस्थेत आहेत. या पायऱ्या उतरून विहिरीत उतरल्यानंतर विहिरीच्या मध्यभागी पश्चिम बाजूला महादेवाचे मंदिर खोदले आहे. त्याचा आकार सुमारे आठ फूट लांब, सात फूट रुंद सहा फूट उंच आहे. या मंदिरावरूनच या तलवार विहिरीची भव्यता जाणून येते. मंदिरात शिवलिंग आहे. मंदिरापासून खाली काही अंतरावर पाणी आहे.तलवार विहिरीची खोली किती हे सांगता येत नाही. मात्र वरून पाण्यात दगड टाकला की विशिष्ट आवाज येतो. हे ऐकून माहीत झाल्याने गडावर येणारा प्रत्येक माणूस विहिरीत दगड टाकून आवाज ऐकण्याचा प्रयत्न करतो आणि विहीर दगडाने भरून काढण्यास हातभार लावतो.तलवार विहिरीपासून जवळच गडावर प्रवेश केल्याबरोबर अखंड खडकात खोदलेले गणपती मारुतीचे मंदिर आहे. या मंदिरात उतरण्यासाठी २९ पायऱ्या उतराव्या लागतात. या मंदिरावर कोणतेही आच्छादन नाही. चौकोनी आकाराच्या खोदकामात उत्तर भिंतीवर दक्षिणाभिमुख गणपती व पूर्व भिंतीवर पश्चिमाभिमुख मारुती अशा मूर्ती आहेत. मारुतीच्या समोरच्या बाजूस दगडात कोरलेली कमान आणि भुयारी मार्ग आहे. मंदिराचे एक वैशिष्ट असं, की सूयोर्दय होत असताना सूर्यकिरण गणपतीच्या मूर्तीवर पडतात आणि सायंकाळी सूर्यास्त होत असताना सूर्यकिरण मारुतीच्या मूर्तीवर येतात. अशा रचनेत खोदलेलं हे मंदिर पूर्व इतिहासातील शिल्प कलाकारांची बौद्धिकता जाणवून देतं. या व्यतिरिक्त गडावर आणखी काही इतिहासातील अवशेष आहेत. गडाच्या समोरच्या एक उंच टेकडी आहे. या टेकडीवरून गडाच्या आजू बाजूना पसरलेल्या निसर्गाचे विहंगम दृश्य पर्यटकांना न्याहाळता येतं. या टेकडीचा पूर्वी टेहळणी टेकडी म्हणून उपभोग केला जात होता. इथून कोयनेचा नागमोडी प्रवाह, पाटण शहर, पवनचक्की प्रकल्प, सह्यादीच्या अफाट पसरलेल्या रांगा पर्यटकांना आकर्षित करतात. या गडाचं दुसरं नाव आहे सुंदरगड, आपलं नाव सर्वार्थाने सिद्ध करणारा हा किल्ला पर्यटकांना खुणावतोय.सुंदरगडाकडे महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग आणि पुरातत्त्व विभागाचं पूर्णत: दुर्लक्ष आहे. या गडापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता, पायऱ्या, रेलिंग, प्रवेशद्वार उभारणी तटावर गरजेनुसार रेलिंग, लोखंडी पूल, पॅगोडा आदी सुविधा उपलब्ध होणे गरजेचं आहे.
माहिती साभार: कुमार भवार