अक्काराणीचा किल्ला / अक्राणी महाल

अक्काराणीचा किल्ला / अक्राणी महाल
जवळचे गाव: अक्राणी
तालुका: धडगाव
जिल्हा: नंदुरबार
अक्राणी हा पूर्वी परगणा होता, याला काही आख्यायिका आहेत. अक्राणी किल्ला महाराणा प्रताप यांच्या बहिणीने बांधला तिचे नाव अक्काराणी होते व तिच्या नावावरूनच या किल्ल्याला ‘अक्काराणीचा महाल’ असे नाव पडले. आज धडगाव तालुक्यास ‘अक्राणी महल’ तालुका असेही संबोधले जाते.
राजवैभवाच्या खुणा आजही जपणारे अक्राणी हे ऐतिहासिक गाव नकाशात धडगाव तालुक्यात असले तरी गावावर प्रत्यक्ष अंमल तळोदा तालुक्याचा आहे. अतिदुर्गम भागात सातपुड्याच्या कड्या कापर्यांमध्ये कोणतीही वाहतूक साधने उपलब्ध नसताना हा किल्ला कसा बांधला गेला असेल याचे आश्चर्य आहे. मोगलांची, होळकर – पेशव्यांची आणि ब्रिटीशांची आक्रमणे झेलत अक्राणीचा किल्ला भग्न अवस्थेत असला तरीही गतकाळातील इतिहासाची साक्ष देतो.
संपूर्ण विटांमध्ये बांधलेल्या या महालाचा बुरुज व प्रवेशद्वार बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. महालाच्या दक्षिण, पूर्व व पश्चिम दिशेच्या भिंती उभ्या असून ठीकठिकाणी पडझड झालेली आहे. महालाचा मुख्य भाग पडलेला असला तरीही अवशेष राजपुतांचा राजेशाही थाट त्यांचा डामडौल याची साक्ष देतात. किल्ल्यात एक भुयार आहे. किल्ल्यातील जुन्या काळातील दगडी वस्तू भग्न अवस्थेत आहेत.
किल्ल्यात एक विहीर व सुंदर असे घोटीव व घडीव दगड वापरून बनवलेले मंदिर आहे, प्रवेशद्वारावर श्रीगणेशाची मूर्ती आहे, मंदिरातून अखंड पाण्याचा स्त्रोत वाहतो तो संपूर्ण वर्षभर आटत नाही. मंदिरावर ठळक अक्षरात “राणी काजल मंदिर” असे लिहिलेले आहे, पण येथील आदिवासींकडून ते “राणी का जल मंदिर” असे असल्याचे सांगितले जाते.
किल्ल्याच्या अवशेषात येथील आदिवासींना चांदीची आणि तांब्याची नाणी सापडली आहेत. त्यातील काही नाण्यांवर ‘शाह’ असा उल्लेख असून काहींवर ‘कुतुबुद्दीन’ असा उल्लेख आहे मात्र सन असलेला भाग तुटलेला आहे.