अकलूजचा किल्ला
किल्ल्याचा प्रकार: भुईकोट
डोंगररांग: डोंगररांग नाही
चढाईश्रेणी: सोपी
जिल्हा: सोलापूर
तालुका: माळशिरस
अकलूज शहरात नीरा नदीच्या काठावर अकलूजचा किल्ला उभा आहे. दोन बलदंड बुरुजांच्या मधोमध पश्चिमाभिमुख महादरवाजा. दाराशी दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोन घोडेस्वार, माहुतासह एक हत्तीदेखील. दरवाजावर जरीपटका मिरवणारा नगारखाना- ज्यात शिंग, तुतारी आणि नगारा वाजवणारे. भोवती सैनिक-चौकीदारांचा पहारा.. हे कुठल्या ऐतिहासिक कथा-कादंबरी वा मालिकेतले वर्णन नाही तर एका ऐतिहासिक भुईकोटाचे हे वास्तव दर्शन आहे.१९७४ पर्यंत अकलूजचा हा भुईकोट अन्य ऐतिहासिक वास्तूंप्रमाणेच एक खिंडार बनले होते. पडलेले तट व बुरूज, माजलेली झाडे आणि प्रातर्विधीपुरता लोकांचा उरलेला संबंध अशी या वास्तूची दुरवस्था होती. परंतु तत्कालीन सरपंच आणि विजयसिंह मोहितेंचे बंधू जयसिंह मोहिते-पाटील यांनी ही दुरवस्था दूर करण्याचे ठरविले. ग्रामपंचायतीची मदत व श्रमदानातून काम सुरू झाले. ढिगाऱ्यांची सफाई झाली. तट-बुरुजांची दुरुस्ती झाली. मोकळ्या जागी बाग, कारंजी अवतरली. आणि मध्यभागी एका उंच टेहळणी बुरुजावर छत्रपतींचा अश्वारुढ पुतळाही उभारला गेला. पाहता पाहता या खिंडाराचे पुन्हा धारातीर्थ बनले. आता ३५ वर्षांनंतर अकलूजच्या या धारातीर्थावर महाराष्ट्राच्या गौरवशाली शिवकथेने पुन्हा एकदा आपला डाव मांडला आहे.शिवजन्म ते शिवराज्याभिषेकापर्यंतचा हा प्रवास. २० शिल्पपट, शिवजन्म व राज्याभिषेकाचे दोन मोठाले देखावे, शिवरायांच्या गडांच्या प्रतिकृती यांतून ही शिवसृष्टी उलडगली आहे.इतिहासअकलुज हे नाव ग्रामदेवता श्री अकलाई देवीच्या नावावरुन पडले आहे. इतिहासप्रसिद्ध असा हा किल्ला इ. स. १२११ मध्ये यादवराजा सिंघन याने बांधलेला आहे. आदिलशाही, मोगल, मराठे आदी सत्ता इथे नांदल्या. औरंगजेब १४ डिसेंबर १६८८ ते १५ फेब्रुवारी १६८९ या काळात इथे मुक्कामाला होता. या काळातच त्याला छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्याची बातमी कळली तेव्हा त्याने अत्यानंदाने अकलूजचे नामकरण ‘असदनगर’ असे केले. छत्रपती संभाजी महाराज, दुसरे बाजीराव आणि ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड डलहौसी यांचेही मुक्काम या भुईकोटाने अनुभवले.पहाण्याची ठिकाणेकिल्ल्यात शिरताना निर्माण केलेले फायबरच्या हत्ती व घोड्यावर बसलेले मावळे आपले स्वागत करतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर नगारखाना असून त्यात विवीध वादकांचे पुतळे बसविलेले आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस चालत गेल्यावर किल्ल्याच्या तटबंदीवर शिवाजी महाराजांच्या जीवन चरीत्रावर आधारीत फायबरची भित्तीचित्रे ( म्युरल्स् ) पाहायला मिळतात. यातील पहिली तीन म्युरल शिवजन्माशी संबंधीत आहेत. त्यानंतर शिवनेरी वरली शिवजन्मस्थानाच्या महालाची प्रतिकृती बनविली असून त्यात शिवाजी महाराजांच्या बारशाचा देखावा उभा केलेला आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या प्रसंगावर आधारीत म्युरल्स् व त्यांच्या बाजूला प्रसंगाची माहिती या गोष्टी पाहायला मिळतात. म्युरल्स् मधील बारकावे, व्यक्तींच्या चेहर्यावरील भाव, आवेश पहाण्यासारखे आहेत. सर्वात शेवटी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगाचा देखावा मोठ्या दालनात साकारला आहे. त्यातील प्रत्येक मुर्तीचा पेहराव, त्यांची रंगसंगती, चेहर्यावरील भाव, डोळे पहाण्यासारखे आहेत.किल्ल्याच्या मधोमध असणार्या उपल्या बुरुजावर (या बुरुजाचा वापर टेहळणीसाठी करण्यात येत असावा.) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविलेला आहे. जिन्याने तिथपर्यंत जाऊन किल्ल्याच्या व आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य पाहाता येते. याच बुरुजावर एका बाजूला दोर लावून बुरुज सर करणारे मावळे दाखवले आहेत. तर दुसर्या बाजूस शेकोटी पेटवून पहार्यावर बसलेले मावळे रामोशी दाखविलेले आहेत.किल्ल्याच्या तटावर विविध जाती धर्माचे मावळे आपापल्या पेहरावातील वैशिष्ट्यासह उभे केलेले आहेत. यात तोफची, मशालजी, तिरंदाज, पहारेकरी, रामोशी ईत्यादींचा समावेश आहे. हे पुतळे पाहात किल्ल्याच्या तटबंदीवर फिरुन नंतर प्रवेशद्वारापाशी असलेल्या संग्राहलयात जावे. या संग्राहालयासमोर हत्तीवरुन दवंडी देणार्या मावळ्याचा पुतळा उभारलेला आहे. संग्राहलयात महत्वाच्या किल्ल्यांच्या फायबरमधील प्रतिकृती बनविलेल्या आहेत. त्यात राजगड, रायगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, प्रतापगड, देवगिरी यांचा समावेश आहे.किल्ल्यात ठिकठिकाणी हिरवळ, फुलझाडे व कारंजी आहेत. त्यामुळे किल्ल्याचा फेरफटका नेत्रसुखद होतो. किल्ल्यातून बाहेर पडून नदीकाठाने बुरुजाला लागून असलेल्या वाटेने गेल्यास तटबंदीतील विरगळ व इतर पूरातन अवशेष पाहाता येतात.
पोहोचण्याच्या वाटा : अकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील महत्वाचे शहर रस्त्याने सर्व शहरांशी जोडलेले आहे.१) पुणे – अकलूज अंतर १६६ कि.मी आहे.२) पुणे – सोलापूर मार्गावरील इंदापूर येथून अकलूजला जाणारा फाटा आहे.३) सोलापूर पंढरपूर(३५ कि.मी.) अकलूज आहे.
सूचना : किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी तिकीट काढावे लागते. किल्ला सकाळी १०:०० ते १:३० व संध्याकाळी २:३० ते ६:३० पाहाण्यासाठी उघडा असतो. संध्याकाळी लाईट आणि साउंड शो असतो, परंतू त्यासाठी किमान २५ प्रेक्षक असणे आवश्यक आहे.