!! गडकोट !!

 गडकोट म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या व आपल्या बापजाद्यानी गाजविलेल्या अतुलनीय पराक्रमाचा वारसा सांगणारी शिल्पे. हे गडकोट आपल्या महाराष्ट्राचा आत्मा आहेत. ह्या गडकोटांसाठी महाराजांनी व मावळ्यांनी वेळप्रसंगी रक्त सांडवून राखले आहेत. महाराज हे गडकोट अगदी प्राणांच्या पलीकडे जपत होते. “सह्याद्री प्रतिष्ठान” हि संस्था महाराजांच्या ह्याच विचारावर गडकोटांच्या संवर्धन कार्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. आज संस्थेच्या माध्यमातून हे दुर्गसंवर्धन कार्य अविरत अन अहोरात्र सुरु आहे. यासाठी संस्थेचा प्रत्येक दुर्गसेवक वचनबद्ध आहे.

 

!! सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र !!

सह्याद्री प्रतिष्ठान हि संस्था छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेल्या गडकोटांच्या संवर्धन कार्याचा वारसा पुढे घेऊन मार्गक्रमण करणारी संस्था आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात संस्थेच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याची अतुलनीय गाथा सांगणाऱ्या गडकोटांचे संवर्धन कार्य अविरत सुरु आहे. हे कार्य यापुढेही असेच अविरत सुरु असेल. आपला अतुलनीय अनमोल ऐतिहासिक वारसा असाच आपल्या पुढच्या पिढ्यांना दाखवता यावा यासाठी असलेला हा अट्टाहास. अन हा वारसा टिकवून ठेवण्यासाठी आपलाही हातभार असावा म्हणूण संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक दुर्गसेवक या कार्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. 

छत्रपती शिवराय त्यांच्या विचारातून आणि कार्यातून आजही जिवंत आहेत, पण आज एकाच गोष्टीचे वाईट वाटते कि इथल्या प्रत्येक माणसाची मने मेलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे प्रत्येक मरगळलेल्या माणसाला नेहमीच प्रेरणा देत आहे आणि यापुढेही राहील. त्याच विचारांवर त्यांची प्रेरणा घेऊन सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र वर्षभर छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य घरोघर पोहचविण्याचे काम करत आहे. यामध्ये आपणही सहभागी व्हा. 

“ संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग ”

खंड हिंदुस्थानच्या रक्षणासाठी धावले ते आमचे बापजादे मराठेच….अन ह्या आमच्या ह्या बापजाद्यांच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा सांगणारे अन आपल्या पराक्रमी इतिहासाची महती आजही टिकवून ठेवणारे हे गडकोट…

सह्याद्रीच्या कुठल्याही शिखरावर उभं राहून सभोवार नजर जरी फिरवली तर दर चार-दोन शिखरांआड एखादं शिखर तटाबुरुजांचं शेला-पागोटं चढवून उभं राहिलेलं आढळतं…. आज ह्या दुर्गांमधील बहुतेक दुर्गांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पायधूळ आपल्या मस्तकी धरण केलेली आहे. पवित्र अशा शिवस्पर्शानं पावन झालेली हि महाराष्ट्राची धारातीर्थे आहेत. ह्या सर्व धारातीर्थांची संवर्धनाची जबाबदारी आपलीच आहे. आपणच सर्वजण ह्या सर्व धारतीर्थ असणाऱ्या गडकोटांचे वारसदार आहोत. आपणही ह्या पवित्र दुर्गसंवर्धन कार्यात सहभागी होऊ शकता. सहभागी होण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा.

ढासळले आहेत, कोसळले आहेत…अगदी आजच्या घडीला पडलेही आहेत, पण उगाच नाही…यांनीच झेललेत अंगावर वार, तोफांचे गोळे…इथेच झालेत तलवारीचे खणखणाट…आताच्या घडीला आहेत पडीक, उदासवाणे, एकलकोंडे…पण एकेकाळी यांनीच अनुभवलाय तो सुवर्णकाळ…एके काळी इथंच झडलेत मुजरे अन इथंच गुंजल्या नौबती आणि नगारे…अन इथल्या दऱ्याखोऱ्यात घुमलाय हर हर महादेव चा गजर…इथल्या तटा – बुरुजांच्या चिरा चिरांमधून आज ही येतोय आवाज “क्षत्रियकुलावंतस” “सिंहासनाधिश्वर” “राजाधिराज” “महाराज”आता आपलं सर्वांचं कर्तव्य आहे ते स्वराज्याचं धन, ती स्वराज्याची दौलत राखण्याचं…

लेखक : - निलेश हनुमंत जेजुरकर पाटील

“ सह्याद्रीचा दुर्गसेवक ”

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र