राजगड संवर्धन मोहीम

राजगड संवर्धन मोहीम

१५, १६, १७ मार्च २०१९
अहोभाग्य या नश्वर देहाचे…२५ वर्ष शिवरायांच्या स्वराज्याची यशोगाथा लिहिलेल्या राजगडावरील सदरेच्या सागवानी लाकडास संजीवनी मिळावी म्हणून त्यातील कांही स्तंभास पुठ्ठी लावून, त्यास पेंट करून पॉलिश करण्यात आले.
राज्य पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाने ही मोहीम राबविण्यात आली. १५ तारखेच्या सकाळी सुशांत मोकाशी, सिद्धेश कानडे व ओंकार शिंदे, आशुतोष बोरकर, दशरथ श्रीराम, आणि राजेश मारणर यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेची सुरुवात झाली. सदरेच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या स्तंभाची सुरुवातीस पॉलिश पेपरने घासून स्वच्छता करण्यात आली. त्यात निर्माण झालेल्या सुरुकात भुसा व फेवीकालचे मिश्रण भरण्यात आले. नंतर कीटकनाशक पॉलिश लावण्यात आले. आतील सदरेच्या ६ स्तंभासही प्रक्रिया करण्यात आली. पूर्ण रात्र व दुसरा पूर्ण दिवस हेच काम झाले. १६ तारखेच्या रात्री मी, गौरव शामकांत शेवाळे, जगदीश पवार, अतिष मुंगसे , शिव भांडेकरी आम्ही रात्री ११ ला पोहोंचलो. सोबत फर्जंदचे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर व त्यांची पूर्ण टीम होती. लगेचच आमचे नगर जिल्ह्यातील सहकारी डॉ रमेश महादेव वामन व त्यांचे चिरंजीव, सह्याद्रीचा शिवछावा प्रशांत काकडे व इतर सहकारीही पोहोंचले. एकत्रित जेवण करून आम्ही सर्वजण कामाला लागलो. बाहेरील व आतील स्तंभ यांना पुढील ६ तासांमध्ये २ कोटिंग चढवण्यात आले. यासोबतच दरवाजा व त्याबाजूस असणाऱ्या स्तंभासही सर्व प्रक्रिया करण्यात आली. पहाटे ४ वाजता आमची चौथी सह्याद्री प्रतिष्ठान अलिबागची टीम दुर्ग सेवक सतिश हातमोडे, आनंदा व त्यांचे सहकारीही पोहोंचले. आम्ही दिलेल्या स्तंभास परत तिसरे कोटिंग लावायचे बाकी होते म्हणून आम्ही त्यांना थोडी विश्रांती करण्यात स सांगितले. कारण पहिले दिलेले कोटिंग वाळण्यास काही अवधी शिल्लक होता. सोबत आणलेले साहीत्य फारसे शिल्लक नव्हते. उरलेल्या १ तासात आम्ही बाकीचे काम उरकले. पहाटे ५ वाजता आम्ही गड उतरण्याचा निर्णय घेतला. आता वेळ होती पनवेल विभागाची. त्यांच्या हातात पुढील सूत्रे सोपवून आम्ही गड उतरण्यास सुरुवात केली. हातमोडे व त्यांच्या टीमने तेथील १४ स्तंभास शेवटचा तिसरा थर लावला. १७ तारखेच्या सकाळी सकाळी आमची पाचवी टीम कल्पेश पवार व ललित पाटील हे आले. उर्वरित स्तंभाची स्वच्छता त्यांनी केली. प्रवीण शिर्के व महेश बुलाख हे सकाळी ११ वाजता पोहोंचले. यांनी राजगडावर भविष्यात करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा घेतला.
जरी मोठे काम झाले असले तरी अजूनही भरपूर काम शिल्लक आहेत. जवळपास ६० स्तंभचे काम बाकी आहे. येत्या पावसाळ्याच्या अगोदर हे काम पूर्णत्वास न्ह्यायचे आहे. मोठ्या कष्टाची आवश्यकता आहे. आम्ही व आपण मिळूनच हे काम पूर्ण होऊ शकते.
सुशांत मोकाशी यांच्या पुढाकाराने पुढील मोहिमेची बांधणी लवकरच आखण्यात येईल. आपला मोठा सहभाग अपेक्षित आहे.


सहभागासाठी संपर्क :

९६८९०१७७३३
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र

घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा