कोरलाई (कोर्लई) किल्ला तोफगाडा लोकार्पण सोहळा

किल्ले कोर्लई येथे सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने तोफगाडे लोकार्पण सोहळा संपन्न
पालखी सोहळा आणि शिवगर्जनांनी गड निनादले

गेली 15 वर्षे सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात आणि गडकिल्ल्यांवर जाऊन रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील कोर्लई किल्ल्यावर तोफगाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यापूर्वी देखील सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने कर्नाळा किल्ला, तुंग किल्ला, गोरखगड, तसेच तोरणा किल्ल्यावर सागवानी दरवाजे बसविण्याचे मोलाचे काम पार पाडले आहे. त्याचप्रमाणे कुलाबा किल्ला, सिंहगड अशा ठिकाणी तोफगाडे देखील याच सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक लोकसहभागातून आणि लोकवर्गणीतून या किल्ल्यावर एक आगळेवेगळे काम घडत आहे. एवढेच नव्हे तर इतिहासामध्ये जो उंदेरी किल्ल्यावरील 16 तोफांचा उल्लेख होता तो उल्लेख इतिहासजमा करून या सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी आणखी दोन तोफा शोधून आता इतिहासाच्या पुस्तकात त्याचा किल्ल्याचा 18 तोफांचा अभिमान वाटावा असा उल्लेख आता करण्यात आला असल्याने सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांनी सांगितले तसेच शिवरायांचा इतिहास अधिकाधिक समाजासमोर प्रत्यक्षात मांडण्याचे काम किती मोलाचे आहे हे दिसून येते.
तीनही बाजूने पाणी आणि अतिशय स्वच्छ परिसर असणारा हा कोर्लई किल्ला पाहता शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची आठवण येते.तेथे असणारे टेहळणी बुरुज, प्रवेश दरवाजा आजही जसेच्या तसे आहेत. परंतु या किल्ल्यावर असणाऱ्या तोफा या जमिनीवर भग्नावस्थेत पडलेल्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांना स्वच्छता मोहीम राबविताना लक्षात आल्यानंतर लोकवर्गणीतून त्यांनी येथील सहा तोफांसाठी सहा सागाचे तोफगाडे तयार करून स्वकष्टाने ते गडावर नेऊन आज 1 मे या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून त्या तोफा या तोफगाड्यांवर ठेवल्या आणि त्यांचे पूजन करून,भंडारा उधळून आणि शिवरायांची पालखी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या परिसरात ढोलताशांच्या गजरात फिरवून शिवगर्जना दिल्या आणि यापुढे देखील असेच मोलाचे काम लोकसहभागातून आणि लोकवर्गणीतून अविरत करण्याची शपथ घेतली.
सह्याद्री प्रतिष्ठान,पेण विभाग, यांनी आयोजित केलेल्या किल्ले कोर्लई तोफगाडा दुर्गार्पण सोहळ्यासाठी शाहीर वैभव घरत, श्री. किशोर धारिया (जलनायक व अध्यक्ष हिरवळ प्रतिष्ठान), शाहीर हेमंतराजे मावळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक समिती सदस्य व अध्यक्ष शिवजयंती उत्सव समिती शिवनेरी, पराग ठाकूर अध्यक्ष आखिल भारतीय ढोल तशा संघ, सुधीर थोरात सह कार्यवाह श्री शिवाजी रायगड स्मारक समिती, निखील मयेकर सरपंच नागाव, मंगेश दळवी (सरपंच मांगरूळ) यांसह शेकडो दुर्गसेवक उपस्थित होते.

  सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र

घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा